आज वास्कोत रंगणार आयएसएलच्या डबलहेडर लढती

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आज पहिल्या डबल हेडरची चुरस अनुभवायला मिळणार आहे. चेन्नईयीन एफसी वगळता केरळा ब्लास्टर्स, जमशेदपूर एफसी व ओडिशा एफसी संघ विजयाच्या शोधात असतील.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आज पहिल्या डबल हेडरची चुरस अनुभवायला मिळणार आहे. चेन्नईयीन एफसी वगळता केरळा ब्लास्टर्स, जमशेदपूर एफसी व ओडिशा एफसी संघ विजयाच्या शोधात असतील. वास्को येथील टिळक मैदानावर जमशेदपूर एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यात संध्याकाळी ५ वाजता, तर बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर चेन्नईयीन एफसी आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात संध्याकाळी ७.३० वाजता सामना होईल.

केरळा ब्लास्टर्सविरुद्ध चेन्नईयीन एफसी सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल. साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने मागील लढतीत जमशेदपूर एफसीला हरविले होते. स्पॅनिश किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सला अजून सूर गवसलेला नाही. चेन्नईयीनच्या पहिल्या विजयात अनिरुद्ध थापाने सुरेख खेळ केला होता. पहिल्याच मिनिटास गोल करून त्याने संघाची बाजू भक्कम केली होती. या संघातील मिझोरामचा खेळाडू लाल्लियानझुआला छांगटे याला आणखी उल्लेखनीय खेळ करावा लागेल. तशी अपेक्षा लाझ्लो यांनी व्यक्त केली आहे.

एटीके मोहन बागानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध शेवटच्या मिनिटास गोल स्वीकारल्यामुळे केरळच्या संघाला बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे सामन्यानंतर प्रशिक्षक व्हिकुना यांनी निराशा व्यक्त केली होती. केरळा ब्लास्टर्सने सर्व सामर्थ्य एकवटले, तर चेन्नईयीनसाठी उद्याची लढत कठीण ठरू शकते. पहिल्या लढतीतील खेळ पाहता, चेन्नईतील संघाचे पारडे थोडेफार वरचढ राहील. चेन्नईयीनपाशी आक्रमक मध्यरक्षक असल्याने हा संघ धोकादायक असल्याचे व्हिकुना यांना वाटते.
जमशेदपूर आणि ओडिशा या संघांना स्पर्धेतील पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर संघाला चेन्नईयीनचे कडवे आव्हान झेपले नाही. स्टुअर्ट बॅक्‍स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा संघाल हैदराबादविरुद्ध पेनल्टी गोल स्वीकारल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. उद्याच्या लढतीत हे पराभूत संघ पूर्ण तीन गुणांसाठी प्रयत्नशील असतील. दोन्ही संघ समान ताकदीचे असल्याने अटीतटीची लढत अपेक्षित असेल. जमशेदपूरचे प्रशिक्षक कॉयल संघातील खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त आहेत. बचावपटू पीटर हार्टली याची दुखापत जास्त चिंतित करणारी आहे.

जमशेदपूर विरुद्ध ओडिशा

 •  यंदा दोन्ही संघ पहिल्या लढतीत पराभूत
 •  वास्को येथे चेन्नईयीनची जमशेदपूरवर २-१ फरकाने मात
 •  बांबोळी येथे ओडिशाची हैदराबादकडून ०-१ फरकाने हार
 •  गतमोसमात दोन्ही संघांचे एकमेकांविरुद्ध समप्रमाणात यश
 •  जमशेदपूरचा घरच्या मैदानावर २-१ असा, तर भुवनेश्‍वर येथे ओडिशाचा २-१ असा विजय
   

चेन्नईयीन विरुद्ध केरळा ब्लास्टर्स

 •  वास्को येथे अगोदरच्या लढतीत जमशेदपूरला नमविल्याने चेन्नईयीनचे ३ गुण
 •  बांबोळी येथे केरळा ब्लास्टरची एटीके मोहन बागानकडून ०-१ फरकाने हार
 •  बांबोळी येथेच केरळाची नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध २-२ गोलबरोबरी
 •  गतमोसमातील दोन्ही लढतीत चेन्नईयीन एफसीचे विजय
 •  चेन्नई येथे ३-१, तर कोची येथे ६-३ फरकाने केरळा ब्लास्टर्सवर मात.

अधिक वाचा :

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला ३९० धावांचे आव्हान 

एफसी गोवाच्या रेडीमला कारणे दाखवा नोटीस

आयएसएलमध्ये बंगळूर सलग दुसऱ्या लढतीत विजयापासून दूर ; कालच्या सामन्यात हैदराबादशी बचावात्मक बरोबरी

 

 

संबंधित बातम्या