ड्रीम इलेव्हन नवे पुरस्कर्ते; आयपीलमध्येही चिनी कंपनीची गुंतवणूक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

विवोचा आयपीएल पुरस्कार ४४० कोटींचा होता, तर ड्रीम इलेव्हन २२२ कोटीच देणार आहे. अर्थात विवो नसल्यास पुढील दोन मोसमांसाठी ड्रीम इलेव्हननने प्रत्येकी २४० कोटी देण्याची तयारी दाखवली आहे, त्यामुळे हा पुरस्कार सरासरी २३३ कोटींपर्यंत होत असल्याचाही दावा केला जात आहे.

मुंबई / नवी दिल्ली: विवो चीनमधील कंपनी असल्याने तिचा पुरस्कार आयपीएलला नको, असे संकेत देत त्यांच्याबरोबरील नाते ब्रेक करण्यात आले; मात्र चीनमधील कंपनीची गुंतवणूक असलेल्या ड्रीम इलेव्हनला आयपीएलचे पुरस्कर्ते म्हणून निवडण्यात आले. विवो पुढील मोसमापासून पुरस्कर्ते म्हणून न आल्यास ड्रीम इलेव्हनच पुरस्कर्ते राहतील, असे संकेत मिळत आहेत. 

विवोचा आयपीएल पुरस्कार ४४० कोटींचा होता, तर ड्रीम इलेव्हन २२२ कोटीच देणार आहे. अर्थात विवो नसल्यास पुढील दोन मोसमांसाठी ड्रीम इलेव्हननने प्रत्येकी २४० कोटी देण्याची तयारी दाखवली आहे, त्यामुळे हा पुरस्कार सरासरी २३३ कोटींपर्यंत होत असल्याचाही दावा केला जात आहे. आयपीएलच्या करारानुसार सर्व फ्रॅंचाईजना पुरस्कार रकमेच्या निम्मी रक्कम वाटून दिली जाते. आश्‍चर्य म्हणजे भारतीय क्रिकेट मंडळातर्फे याबाबतची निविदा काढताना तीनशे कोटी देणाऱ्या कंपन्याच पुरस्कर्ते होण्यास पात्र ठरतील, असे सांगण्यात आले होते. आता ड्रीम इलेव्हनचा पुरस्कार त्याहून कमी म्हणजे २२२ कोटींचाच आहे. लॉकडाऊनमधील आर्थिक परिस्थिती विचारात घेतल्यास हा करार नक्कीच उत्साहवर्धक असल्याचा दावा भारतीय मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत. 

ड्रीम इलेव्हनमध्ये टेनसेंट या चिनी कंपनीची भागीदारी आहे. त्यामुळे नवा वाद होण्याची शक्‍यता आहे; मात्र टेनसेंटचे या कंपनीतील भाग दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे, असा दावा भारतीय मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत. हर्ष जैन आणि भावित शेठ या भारतीयांनी त्याची स्थापना केली आहे. त्यात काम करणारे ४०० हून अधिक कर्मचारी भारतीय आहेत. त्यातील कलारी कॅपिटल आणि मल्टिप्लेक्‍स इक्विटीची गुंतवणूक जास्त आहे; तसेच त्यांची उत्पादने भारतीयांचा विचार करून तयार होतात, असेही सांगण्यात आले. 

वादग्रस्त लीगचे पुरस्कर्ते?
ड्रीम इलेव्हनविरुद्ध भारतीय क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाची चौकशी सुरू आहे. लॉकडाऊन कालावधीत चीनमधील ट्‌वेंटी २० लीगचे प्रसारण होत असल्याचे फॅनकोडने जाहीर केले होते. प्रत्यक्षात ही लीग पंजाबमधील गावात खेळवण्यात आली होती. या चौकशीत खेळाडूंनी परिधान केलेल्या पोषाखावर ड्रीम इलेव्हनचे बोधचिन्ह होते. लीग प्रक्षेपित झालेले फॅनकोड तसेच ड्रीम इलेव्हन हे ड्रीम स्पोर्टस्‌ ग्रुपचे भाग आहेत. 

कोण आहेत ड्रीम इलेव्हन

  • आयपीएलचे यापूर्वी सहपुरस्कर्ते
  • मुंबईत मुख्यालय, २००८ च्या चॅम्पियन्स लीगमध्ये ओटॅगो व्होल्टस्‌ संघाचे पुरस्कर्तेही
  • आयपीएल तसेच आयसीसीचेही फॅंटसी क्रिकेट सहकारी
  • न्यूझीलंडमधील सुपर स्मॅश तसेच विंडीजमधील सुपर टेन व्हिन्सी प्रीमियर लीगचेही मुख्य पुरस्कर्ते

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या