INDvsENG 2nd ODI: जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्सच्या तडाखेबाज खेळीमुळे पाहुणा संघ विजयी 

INDvsENG 2nd ODI: जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्सच्या तडाखेबाज खेळीमुळे पाहुणा संघ विजयी 
England

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या संघाने दमदार विजय मिळवलेला आहे. आणि या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताशी बरोबरी साधली आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाने फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावत 336 धावा केल्या होत्या. त्याबदल्यात इंग्लंडच्या संघाने हे लक्ष्य 43.3 षटकात चार गडी गमावत गाठले.   

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा गडी गमावत 337 धावांचे लक्ष्य इंग्लंड संघाला दिले होते. भारताची सुरवात आज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खराब झाल्याचे पाहायला मिळाले. शिखर धवन अवघ्या चार धावांवर टॉप्लेचा शिकार ठरला. यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आज पुन्हा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माला (25) सॅम करणने आदिल रशीदकरवी झेलबाद केले. मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकीय भागीदारी केली. या दोघांनी मिळून 127 धावा केल्या. विराट कोहली 66 धावांवर असताना, आदिल रशीदने जोस बटलर करवी त्याला झेलबाद केले. 

यावेळेस, केएल राहुलने 114 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 2 षटकाराच्या जोरावर 108 धावा केल्या. मात्र त्यानंतर त्याला टॉम करणने बाद केले. याशिवाय रिषभ पंतने आज पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी केली. त्याने 40 चेंडूत 77 धावा कुटल्या. यावेळेस त्याने 3 चौकार आणि तब्बल 7 उतुंग षटकार खेचले. रिषभ पंतला देखील टॉम करणने जेसन रॉय करवी झेलबाद केले. यानंतर, हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 35 धावा केल्या. हार्दिक पांड्यानंतर आलेल्या कृणाल पांड्याने नाबाद 12 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने इंग्लंडला 337 धावांचे लक्ष्य दिले होते. 

यानंतर, भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरवात आज दमदार झाल्याचे पाहायला मिळाले. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्याच विकेटसाठी शतकीय भागीदारी रचली. जेसन रॉयने 55 धावा केल्या. तर जॉनी बेअरस्टोने 124 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने 112 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 7 षटकार खेचले. जेसन रॉय धावबाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या बेन स्टोक्सने देखील आज धमाकेदार फलंदाजी केली. मात्र तो 99 धावांवर असताना भुवनेश्वर कुमारने त्याला झेलबाद केले. बेन स्टोक्सने 52 चेंडूत 4 चौकार आणि तब्बल 10 षटकार लगावले. यानंतर कर्णधार जोस बटलर खातेही न खोलता प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र डेव्हिड मलन (16) आणि लिव्हिंगस्टोन (27) यांनी उरलेली कसर पूर्ण करत इंग्लंडच्या संघाला विजय मिळवून दिला.           

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना टीम इंडियाने आपल्या खिशात घातला होता. या सामन्यात भारताने 66 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला होता. तर आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने विजय मिळवला असल्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या संघाने 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे आगामी तिसरा व शेवटचा सामना हा आता महत्वपूर्ण ठरणार आहे.           

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com