Dwayne Bravoचा आयपीएलला अलविदा! आता CSK संघात सांभाळणार महत्त्वाची जबाबदारी

अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली असून आता त्याच्यावर चेन्नई सुपर किंग्सने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
Dwayne Bravo
Dwayne BravoDainik Gomantak

Dwayne Bravo: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. पण असे असले तरी त्याचे आयपीएलशी नाते कायम राहाणार आहे. कारण, तो आता जरी खेळाडू म्हणून दिसणार नसला तरी तो एका वेगळ्या भूमिकेतून चाहत्यांसमोर येणार आहे.

त्याला चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. गेल्या जवळपास 10 वर्षापासून ब्रावो चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू होता. पण आयपीएल 2023 पूर्वी त्याला चेन्नईने संघातून मुक्त केले होते. पण आता त्याने निवृत्ती जाहीर केल्याने तो आता चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिल.

चेन्नईचा गेल्यावर्षापर्यंत गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या लक्ष्मीपती बालाजीने एका वर्षासाठी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता त्याची जागा आयपीएल 2023 मध्ये ब्रावो सांभाळताना दिसेल. पण असे असले तरी बालाजी सुपर किंग्स ऍकेडमीच्या कामकाजात सहभागी असेल.

Dwayne Bravo
IPL 2023 पूर्वी मुंबई इंडियन्सने या खेळाडूला वगळले, CSK मध्येही मोठे बदल

ब्रावो निवृत्तीबद्दल म्हणाला, 'मी माझ्या नवीन प्रवासासाठी उत्सुक आहे. कारण ही भूमिका अशी आहे, जी मला खेळाडू म्हणून पूर्ण कारकिर्द घडवल्यानंतर निभावायची होती. मला गोलंदाजांबरोबर काम करायला आवडते आणि मी या भूमिकेसाठी उत्सुक आहे.'

'एक खेळाडू ते प्रशिक्षक असा प्रवास करताना मला फार काही बदलावे लागेल, असे वाटत नाही. कारण मी खेळताना नेहमीच गोलंदाजांबरोबर काम केले आहे आणि फलंदाजाच्या एक पाऊल पुढे विचार करण्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवण्याचा प्रयत्न करत असतो. फरक फक्त इतकाच असेल की आता मी मिड-ऑन किंवा मिड-ऑफला क्षेत्ररक्षणासाठी उभा नसेल."

ब्रावो आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 161 सामन्यांमध्ये 183 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 5 अर्धशतकांसह 1560 धावाही केल्या आहेत. याबद्दल तो म्हणाला, 'मी कधीही विचार केला नव्हता की मी आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल. पण मी आनंदी आहे की मी आयपीएल इतिहासाचा एक भाग बनलो.'

ब्रावोने चेन्नईव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स संघांचेही आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com