ISL 2020-21: ईस्ट बंगालचा जमशेदपूरला पराभवाचा धक्का

दैनिक गोमन्तक
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

ईस्ट बंगालने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी जमशेदपूर एफसील पराभवाचा धक्का दिला.

पणजी : ईस्ट बंगालने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी जमशेदपूर एफसील पराभवाचा धक्का दिला. कोलकात्यातील संघाने 2-1 फरकाने विजय नोंदवून पाच सामन्यानंतर पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. जर्मन मध्यरक्षक मॅटी स्टेनमन याने सहाव्या मिनिटास ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. 68व्या मिनिटास आयरीश मध्यरक्षक अँथनी पिल्किंग्टन याने संघाच्या खाती दुसऱ्या गोलची भर टाकली. कर्णधार पीटर हार्टली याच्या भेदक हेडिंगमुळे जमशेदपूर एफसीने 83व्या मिनिटास पिछाडी एका गोलने कमी केली, पण त्यांना बरोबरी साधता आली नाही. शेवटच्या मिनिटास नेरियूस व्हाल्सकिस याचा हेडर ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुब्रत पॉल याने विफल ठरविला.

ISL 2020-21: सलग चार बरोबरीनंतर बलाढ्य मुंबई सिटीविरुद्ध जिंकण्याचा दबाव एफसी...

स्पर्धेतील सहाव्या पराभवामुळे जमशेदपूरच्या प्ले-ऑफ फेरीच्या आशांनाही धक्का बसला आहे. त्यांचे 16 लढतीनंतर 18 गुण आणि सातवा क्रमांक कायम राहिला. ईस्ट बंगालने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता 16 लढतीनंतर 16 गुण झाले असून नववा क्रमांक मिळाला आहे.

सामन्याच्या सुरवातीसच सेटपिसेसवर ईस्ट बंगालने आघाडी प्राप्त केली. नारायण दासच्या डाव्या पायाच्या सणसणीत कॉर्नर फटक्यावर मॅटी स्टेनमन याने हेडिंगने नेटची दिशा दाखविली. गोलरक्षक टीपी रेहेनेश जाग्यावर नसताना चेंडूने गोलपोस्टला धडक देत लक्ष्य साधले. सेटपिसेसेवर ईस्ट बंगालने नोंदविलेला हा मोसमातील सातवा गोल ठरला. त्यापूर्वी एक मिनिट अगोदर अँथनी पिल्किंग्टन याचा धोकादायक प्रयत्न जमशेदपूरचा बचावपटू स्टीफन एझे याने वेळीच रोखल्यामुळे गोलची नोंद झाली नाही. विश्रांतीपूर्वी राजू गायकवाडच्या थ्रो-ईनवर स्टेनमनचा हेडर किंचित हुकल्यामुळे ईस्ट बंगालची आघाडी एका गोलपुरती मर्यातील राहिली.

उत्तरार्धातील खेळात अँथनी पिल्किंग्टन याने ईस्ट बंगालच्या आघाडीत वाढ केली. मॅटी स्टेनमन याच्या असिस्टवर आयरीश खेळाडूने अचूक लक्ष्य साधले. त्यापूर्वी जमशेदपूरला नशिबाची साथ लाभ नव्हती. त्यांच्या नेरियूस व्हाल्सकिस याचा फटका गोलरक्षकाच्या उजव्या बाजूच्या पोस्ट आपटल्यामुळे दिशाहीन ठरला. सामना संपण्यास सात मिनिटे असताना इंग्लिश खेळाडू हार्टली याचे सेटपिसेसवर हेडिंग भेदक ठरल्यामुळे जमशेदपूरला पिछाडी कमी करता आली. ऐतॉर मॉनरॉयच्या कॉर्नरवर इसाक वनमाल्सॉमा याने दिलेल्या क्रॉसपासवर हार्टलीने उंच उडी घेत नेम साधला.  

दृष्टिक्षेपात...

- मॅटी स्टेनमन याचे 13 आयएसएल सामन्यात 4 गोल

- अँथनी पिल्किंग्टनचे मोसमातील 14 लढतीत 2 गोल

- पीटर हार्टली याचे 15 लढतीत 2 गोल

- 3 बरोबरी व 2 पराभवानंतर ईस्ट बंगालचा विजय

संबंधित बातम्या