ईस्ट बंगालला आज नॉर्थईस्ट युनायटेडविरूद्ध विजयाची अपेक्षा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 डिसेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करताना सलग दोन सामने गमावलेल्या ईस्ट बंगालला सावरण्याची गरज आहे, मात्र आज त्यांच्यासमोर तीन सामने अपराजित असलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडचे कठीण आव्हान असेल.

पणजी  :  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करताना सलग दोन सामने गमावलेल्या ईस्ट बंगालला सावरण्याची गरज आहे, मात्र आज त्यांच्यासमोर तीन सामने अपराजित असलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडचे कठीण आव्हान असेल.

सामना वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. सध्या पाच गुण असलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडही शनिवारी विजयाची अपेक्षा बाळगून असेल. पूर्ण तीन गुण मिळाल्यास त्यांचीही गुणतक्त्यातील स्थिती चांगलीच सुधारेल. 

ईस्ट बंगालला एटीके मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसी संघाविरुद्ध पराभूत व्हावे लागले. या कामगिरीने संघाचे प्रशिक्षक रॉबी फावलर नक्कीच चिंतित असतील. ईस्ट बंगालला स्पर्धेत अजून एकही गोल नोंदविता आलेला नाही. वैयक्तिक चुकांमुळे पराभव झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्व आघाड्यांवर संघात भक्कम पर्याय असणे आवडेल असे त्यांनी नमूद केले. 
नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रशिक्षक जेरार्ड नूस यांनी सांगितले की, ‘‘आमची वाटचाल चांगल्या दिशेने असली, तरी बरीच सुधारणा करावी लागेल. आम्हाला एका वेळी एका सामन्याचा विचार करावा लागेल. जिंकण्याचे लक्ष्य राहील.’’ मुंबई सिटीला नमविल्यानंतर नॉर्थईस्टने केरळा ब्लास्टर्स व एफसी गोवाविरुद्ध बरोबरीचा एक गुण विभागून घेतला आहे.

संबंधित बातम्या