'टेन मेन` ईस्ट बंगालची जमशेदपूर एफसी बरोबर गोलशून्य बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

कोलकात्याच्या ईस्ट बंगालने गुरुवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलमध्ये झुंजार खेळ केला. तब्बल 65 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही त्यांनी जमशेदपूर एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले.

पणजी : कोलकात्याच्या ईस्ट बंगालने गुरुवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलमध्ये झुंजार खेळ केला. तब्बल 65 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही त्यांनी जमशेदपूर एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले. विशेष बाब म्हणजे, स्पर्धेत पाच गोल केलेल्या नेरियूस व्हॅल्सकिस याच्यावर दक्ष पहारा राखत ईस्ट बंगालच्या बचावफळीने त्याला मोकळीक मिळू दिली नाही. सहा मिनिटांच्या इंज्युरी टाईममध्ये जमशेदपूर संघाचेही सामर्थ्य दहा खेळाडूंवर आले.

 

 

सामना काल वास्को येथील टिळक मैदानावर झाला. मध्यरक्षक युजिनसन लिंगडोह याला 25व्या मिनिटास रेड कार्ड मिळाल्यामुळे ईस्ट बंगालला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटास जमशेदपूर एफसीचाही एक खेळाडू कमी झाला. त्यांच्या लाल्डिनलियाना रेन्थलेई सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. रेन्थलेई याला पहिले यलो कार्ड 58व्या मिनिटास मिळाले होते. ओळीने तीन सामने गमावलेल्या रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने आयएसएलमधील पहिल्या गुणाची कमाई केली. स्पर्धेतील तिसऱ्या बरोबरीमुळे ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरचे पाच सामन्यातून सहा गुण झाले आहेत. त्यांनी अन्य एका लढतीत विजय मिळविला असून एक पराभव पत्करला आहे. मागील लढतीत एटीके मोहन बागानला नमविलेल्या जमशेदपूर एफसीला आज खेळात मोठी उंची गाठता आली नाही.

 

 

सामन्याच्या पूर्वार्धात ईस्ट बंगालला मोठा झटका बसला. मध्यरक्षक युजिनसन लिंगडोह याचा चार मिनिटांत दोन यलो कार्ड मिळाल्यामुळे कोलकात्यातील संघाला एका खेळाडूस मुकावे लागले. लिंगडोह याने 21व्या मिनिटास लाल्डिनलियाना रेन्थलेई याला पाडले, त्यामुळे त्याला पहिले यलो कार्ड मिळाले, नंतर 25व्या मिनिटास अलेक्झांडर लिमा याला रोखताना पाडल्यामुळे रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी युजिनसनला दुसरे यलो कार्ड दाखवत मैदानाबाहेर पाठविले.

 

 

पूर्वार्धातील बाकी वीस मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही ईस्ट बंगालने जमशेदपूरची आक्रमणे यशस्वी होऊ दिली नाहीत. त्यामुळे विश्रांतीला दोन्ही संघ ड्रेसिंग रुममध्ये परतले तेव्हा गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. विश्रांतीस चार मिनिटे बाकी असताना जमशेदपूरचा आघाडीपटू नेरियूस व्हॅल्सकिस याचे ऐतॉर मॉनरॉय याच्या फ्रीकिकवरील भेदक हेडिंग गोलरक्षक शंकर रॉय याने फोल ठरविल्यामुळे ईस्ट बंगालचे नुकसान झाले नाही. तासाभराच्या खेळानंतर जमशेदपूरच्या अलेक्झांडर लिमा याचा प्रयत्नही असफल ठरल्यामुळे गोलशून्य बरोबरी कायम राहिली.

 

 

ईस्ट बंगालचे प्रशिक्षक रॉबी फॉवलर यांनी नियमित गोलरक्षक देबजित मजुमदार याच्याऐवजी शंकर रॉय याला स्टार्ट लाईनअपमध्ये स्थान दिले, मात्र 61व्या मिनिटास चेंडू अडविताना स्नायू दुखावल्यामुळे आयएसएल पदार्पण केलेल्या शंकरला मैदान सोडावे लागले आणि त्याची जागा देबजितने घेतली.

 

दृष्टिक्षेपात...

- आयएसएलमध्ये पदार्पण करणाऱ्या ईस्ट बंगालचा तब्बल ३ लढतीनंतर गुण

- आयएसएलमध्ये प्रथमच ईस्ट बंगालची क्लीन शीट

- जमशेदपूर एफसीच्या स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेड व बंगळूरप्रमाणे ३ बरोबरी

- जमशेदपूर संघाची यंदा पहिलीच क्लीन शीट

- जमशेदपूर एफसी ६ गुणांसह पाचव्या स्थानी, तर १ गुण मिळवून ईस्ट बंगाल अकराव्या स्थानी कायम

 

अधिक वाचा :

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत डेव्हिड वॉर्नर खेळणार नाही

संबंधित बातम्या