राष्ट्रीय स्पर्धेत बुद्धिबळाच्या समावेशासाठी प्रयत्न

किशोर पेटकर
गुरुवार, 30 जुलै 2020

वीजमंत्री काब्राल यांच्या अध्यक्षतेखालील राज्य संघटना करणार मागणी

पणजी : गोव्यात नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ खेळाचा समावेश व्हावा यासाठी गोवा बुद्धिबळ संघटना प्रयत्नरत आहे.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने २०२१ साली हरियानात होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये बुद्धिबळास समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. या धर्तीवर गोवा बुद्धिबळ संघटना राष्ट्रीय स्पर्धेत बुद्धिबळ खेळासाठी आग्रही राहीलअसे संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी सांगितले. ते अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे खजिनदारही आहेत. संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या पाठबळासह मागणी रेटली जाईलअसे बांदेकर यांनी नमूद केले.

गोव्यासाठी बुद्धिबळ हा यशस्वी खेळ आहे. या खेळात गोव्याचा एक ग्रँडमास्टर आणि चार इंटरनॅशनल मास्टर खेळाडू आहे. अनुराग म्हामल हा गोव्याचा ग्रँडमास्टर आहे. इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी सलग दोन वर्षे राष्ट्रीय महिला विजेती आहेतसेच तिने ऑनलाईन चेस ऑलिंपियाड स्पर्धेसाठीही भारतीय संघात स्थान मिळविले आहे. राष्ट्रीय स्पर्धेततसेच राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याने वेळोवेळी पदके जिंकली आहेत. या कामगिरीस अनुसरून बुद्धिबळ संघटना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आग्रही आहे.

हरियानात पुढील वर्षी होणारी चौथी खेलो इंडिया यूथ गेम्स टोकियो ऑलिंपिकनंतर होणार आहे. या स्पर्धेत बुद्धिबळाचा समावेश व्हावा यासाठी महासंघाचे सचिव विजय देशपांडे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयास पत्र पाठवून मागणी केल्याची माहिती बांदेकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर राज्य क्रीडा खात्याचे लक्ष वेधण्यासाठी गोवा बुद्धिबळ संघटनेचे प्रयत्न असतील असे संकेत त्यांनी दिले.

 संपादन - तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या