करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्रसमोर गोव्याचे सपशेल नमते

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात सौराष्ट्रने सामना ९० धावांनी जिंकून सलग तिसरा विजय प्राप्त केला.

पणजी : सलामीवीर अवी बारोट याच्या तुफानी शतकानंतर गोव्याने सौराष्ट्रसमोर सपशेल नमते घेतले. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात सौराष्ट्रने सामना ९० धावांनी जिंकून सलग तिसरा विजय प्राप्त केला.

सामना शुक्रवारी इंदूर-मध्य प्रदेश येथील होळकर स्टेडियमवर प्रकाशझोतात झाला. गोव्याने नाणेफेक सौराष्ट्रला प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. बारोटच्या १२२ धावांमुळे त्यांनी ५ बाद २१५ धावा केल्या. सौराष्ट्रच्या प्रभावी गोलंदाजीसमोर गोव्याला २१६ धावांचे आव्हान अजिबात झेपले नाही. डावातील आठ चेंडू बाकी असताना त्यांचा डाव १२५ धावांत आटोपला. गोव्यातर्फे यष्टिरक्षक-फलंदाज एकनाथ केरकर याने सर्वाधिक ३२ धावा केल्या. गोव्याचा हा तीन लढतीतील दुसरा पराभव ठरला. अन्य लढतीत त्यांनी सेनादलास नमविले होते.

बारोटचे झंझावाती शतक

विदर्भाविरुद्ध अगोदरच्या लढतीत ९३ धावांवार बाद झालेल्या बारोट याने शुक्रवारी कारकिर्दीतील पहिले टी-२० शतक झळकाविले. गोवाच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखताना त्याने समर्थ व्यास याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. २८ वर्षीय बारोट १९व्या षटकात बाद झाला. दर्शन मिसाळने त्याला धाबवाद केले. बारोटने कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-२० कामगिरी नोंदविताना ५३ चेंडूंत ११ चौकार व सात षटकारांच्या मदतीने १२२ धावा केल्या. त्याने ४४ चेंडूंत शतक पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र : २० षटकांत ५ बाद २१५ (अवी बारोट १२२- ५३ चेंडू, ११ चौकार, ७ षटकार, समर्थ व्यास ४१- २९ चेंडू, २ चौकार, ३ षटकार, प्रेरक मांकड २०, पार्थ चौहान १३, दर्शन मिसाळ ४-०-३१-०, अशोक डिंडा ४-०-३२-२, लक्षय गर्ग ४-०-४२-१, दीपराज गावकर ४-०-६३-०, अमित वर्मा १-०-१७-०, सुयश प्रभुदेसाई ३-०-२९-०) वि. वि. गोवा : १८.४ षटकांत सर्व बाद १२५ (वैभव गोवेकर ०, आदित्य कौशिक २२, लक्षय गर्ग ३, स्नेहल कवठणकर १६, अमित वर्मा २३, सुयश प्रभुदेसाई १, एकनाथ केरकर ३२, दर्शन मिसाळ ३, दीपराज गावकर १४, मलिक सिरूर नाबाद ६, अशोक डिंडा १, जयदेव उनाडकट ४-०-२८-३, चेतन सकारिया ४-०-१५-२, चिराग जानी ३.४-०-२४-३, धर्मेंद्रसिंह जडेजा ४-०-२८-१, प्रेरक मांकड ३-०-३०-१).

दृष्टिक्षेपात सामना...

  • - सौराष्ट्रच्या ५ बाद २१५ धावा, यंदाच्या स्पर्धेत दुसऱ्यांदा गोव्याविरुद्ध दोनशे धावांची नोंद, स्पर्धेतील पहिल्या लढतीत मध्य प्रदेशच्या ३ बाद २१४ धावा
  • - सौराष्ट्राची मोसमात दुसऱ्यांदा द्विशतकी धावसंख्या, विदर्भाविरुद्ध ७ बाद २३३
  • - गोव्याच्या दीपराज गावकरच्या ४ षटकांत १५.७५च्या इकॉनॉमीने ६३ धावा, गोव्यातर्फे टी-२० क्रिकेटमध्ये सर्वांत महागडी गोलंदाजी, यापूर्वी सौरभ बांदेकर (विरुद्ध हैदराबाद, २९ जानेवारी २०१७) व विजेश प्रभुदेसाई (विरुद्ध पंजाब, २८ फेब्रुवारी २०१९) यांच्या ४ षटकांत १३.५च्या इकॉनॉमीने प्रत्येकी ५४ धावा

संबंधित बातम्या