भारताचा पराभव झाल्याने इंग्लंडही प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळण्यास घाबरले का?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 डिसेंबर 2020

भारतीय संघ भविष्यात प्रकाशझोतातील कसोटीस विरोध करेल, एवढेच नव्हे तर इंग्लंडही पुढील मोसमात ऑस्ट्रेलियात प्रकाशझोतातील कसोटी खेळण्याबाबत फेरविचार करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

ॲडलेड- ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची प्रकाशझोतातील पहिली कसोटी सहज जिंकली असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियास प्रकाशझोतातील कसोटींबाबत चिंता वाटत आहे. भारतीय संघ भविष्यात प्रकाशझोतातील कसोटीस विरोध करेल, एवढेच नव्हे तर इंग्लंडही पुढील मोसमात ऑस्ट्रेलियात प्रकाशझोतातील कसोटी खेळण्याबाबत फेरविचार करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

भारताने प्रकाशझोतातील कसोटी ५३ धावांच्या आघाडीनंतर गमावली. इंग्लंडही प्रकाशझोतातील कसोटीस तयार नव्हते. तेही पहिल्या डावातील आघाडीनंतर पराजित झाले. दोन्ही कसोटीत जोश हेझलवूडने प्रभावी कामगिरी केली होती. आता भारताचा कोसळता डाव पाहून इंग्लंड संघ गुलाबी चेंडूच्या कसोटीस नकार देण्याची शक्‍यता आहे. पहिल्या डावातही चेंडू भारतीय फलंदाजांच्या बॅटला स्पर्श करून जात होता, पण तो क्षेत्ररक्षकांपर्यंत पोहोचत नव्हता. दुसऱ्या डावात हे घडले. याकडे पॅट कमिन्सने लक्ष वेधले. बॅटला स्पर्श झालेले चेंडू क्षेत्ररक्षकांपर्यंत सातत्याने पोहोचणे प्रथमच अनुभवले, असे जोश हेझलवूड म्हणाला. प्रकाशझोत कसोटीस धास्तावणे चुकीचे आहे, असे ऑस्ट्रेलियातील अभ्यासक सांगतात. गुलाबी चेंडूची दृष्यमानता वाढली आहे. चेंडूही लवकर जुना होत नाही. मात्र गुलाबी आणि लाल चेंडूस सामोरे जाताना तंत्र वेगळे असते, हे त्यांनी मान्य केले. प्रकाशझोताच्या कसोटीच्यावेळी असलेले गवत पूर्णपणे वेगवान गोलंदाजांना पोषक नसते. मात्र हे गवत पाहून ऑस्ट्रेलिया गोलंदाजांनी  टप्पा फलंदाजांच्या जवळपास ठेवला. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडचा आणि आत्ता भारताचा डाव स्वच्छ सूर्यप्रकाशात संपला होता, याकडेही लक्ष वेधले गेले.

वॉर्नरचे त्रिशतक 
प्रकाशझोतातील कसोटीत फलंदाजही यशस्वी ठरले आहेत. गतवर्षी डेव्हिड वॉर्नरने पाकविरुद्ध नाबाद ३५५ धावा केल्या होत्या, तर यासीर शाहने शतक केले होते. चार वर्षांपूर्वी ब्रिस्बेनला पाकने ४९० धावांचा पाठलाग जवळपास केला होता.

संबंधित बातम्या