IndvsEng Day 4th: अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडचा संघ 178 धावांवर आटोपला; भारताला 420 धावांचे लक्ष्य  

दैनिक गोमन्तक
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आणि आज या सामन्याचा चौथा दिवस संपेपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एक गडी गमावत 39 धावा केलेल्या आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आणि आज या सामन्याचा चौथा दिवस संपेपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एक गडी गमावत 39 धावा केलेल्या आहेत. चौथ्या दिवशी टीम इंडियाने सहा विकेट्स गमावून 257 धावांच्या पुढे खेळण्यास सुरवात केली. त्यानंतर भारतीय संघ 337  धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या डावात इंग्लंडपेक्षा 241 धावांनी मागे होता. इंग्लंडच्या संघाने बढत मिळवल्यानंतर देखील दुसऱ्या डावात जो रूटच्या नेतृत्वाखालील संघ 46.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. व आता इंग्लंडने भारतासमोर 420 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारताने एक गडी गमावून 39 धावा केल्या होत्या. आणि सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 381 धावा कराव्या लागणार आहेत. 

टीम इंडियाच्या खेळाडूने जिंकला आयसीसीचा Player Of The Month पुरस्कार

इंग्लंडच्या संघाने 420 धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला रोहित शर्माच्या रूपात पहिला झटका बसला. रोहित शर्मा अवघ्या 12 धावांवर असताना, त्याला जॅक लीचने बाद केले. त्यामुळे खेळ संपला तेंव्हा टीम इंडियाने एक गडी गमावून 39 धावा केलेल्या आहेत. तर, शुभमन गिल 15 आणि चेतेश्वर पुजारा 12 धावांवर खेळत आहेत. याच्याअगोदर पहिल्या डावात 241 धावांची बढत मिळवलेल्या इंग्लंडच्या संघाला रविचंद्रन अश्विनने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत जोरदार धक्का दिला. आर अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सला अजिंक्य रहाणे करवी झेलबाद केले. त्यानंतर डॉम सिब्लेला देखील आर अश्विनने माघारी धाडले. डॉम सिब्ले 16 धावांवर चेतेश्वर पुजाराकडे झेल देत बाद झाला. 

डॉम सिब्ले आणि रोरी बर्न्स हे इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर भारतीय संघाला तिसरी विकेट इशांत शर्माने मिळवून दिली. त्याने डॅनियल लॉरेन्सला 18 धावांवर पायचीत केले. त्यानंतर पुन्हा एकदा आर अश्विनने फिरकीची कमाल दाखवत बेन स्टोक्सला आऊट केले. बेन स्टोक्स सात धावांवर असताना आर अश्विनने त्याला रिषभ पंत करवी झेलबाद केले. तर मैदानावर पाय रोवण्याच्या प्रयत्नात असलेल्या जो रूटला जसप्रित बुमराहने बाद करत भारताला पाचवी विकेट मिळवून दिली. 32 चेंडूंचा सामना करत, 40 धावा केलेल्या जो रूटला जसप्रित बुमराहने पायचीत केले. त्यानंतर ओली पोप आणि जोस बटलर या दोघांना देखील शाहबाझ नदीमने बाद केले. ओली पोप 28 धावांवर आणि जोस बटलर 24 धावांवर बाद झाले. 

यानंतर, डोम बेसच्या रूपात भारताला आठवी विकेट मिळाली. डोम बेसला देखील आर अश्विनने आऊट केले. व त्यानंतर जोफ्रा आर्चर आणि जेम्स एंडरसन यांना देखील आर अश्विनने बाद केले. जोफ्रा आर्चर अश्विनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. तर जेम्स एंडरसन पायचीत झाला. त्यामुळे इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 178 धावांवर आटोपला. तसेच दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना भारताकडून सर्वाधिक विकेट्स आर अश्विनने घेतल्या. आर अश्विनने दुसऱ्या डावात सहा बळी टिपले. आणि शाहबाझ नदीमने दोन विकेट मिळवल्या. याशिवाय इशांत शर्मा आणि जसप्रित बुमराहने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.        

संबंधित बातम्या