भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी होणारच; कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतरही ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ ठाम

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

रविवारी कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे दक्षिण ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. त्यामुळे पश्‍चिम ऑस्ट्रेलिया, तान्सामानिया आणि उत्तर राज्यांनी आपापल्या सीमा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला.

मेलबर्न- युरोपप्रमाणे आता जगभरात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून सर्वांसमोर पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित होत असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलियालाही पुन्हा विळखा बसत आहे. परिस्थिती आव्हानात्मक होत असली, तरी आम्ही मेलबर्नला होत असलेला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना आयोजित करूच, असा विश्‍वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला आहे.

रविवारी कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे दक्षिण ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. त्यामुळे पश्‍चिम ऑस्ट्रेलिया, तान्सामानिया आणि उत्तर राज्यांनी आपापल्या सीमा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला. क्वीन्सलॅंडने तर सर्व पर्यटकांना ॲडलेड येथील हॉटेलांमध्ये दोन आठवड्यांचे विलगीकरण सक्तीचे केले आहे.

दक्षिण ऑस्ट्रेलियात बदलत असलेल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. कोणत्याही परिस्थितीत ॲडलेड ओव्हलवर नियोजित असलेला पहिला कसोटी सामना खेळवण्यास आम्ही कटिबद्ध असू, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. दक्षिण ऑस्ट्रेलिया, तान्सानिया आणि क्वीन्सलॅंड या ठिकाणांहून येणारे ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय तसेच ट्‌वेन्टी-२० संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ गुरवारी सिडनीत दाखल होऊन सराव सुरू करतील; परंतु ॲडलेड येथून कोणताही खेळाडू येथे येणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपल्या सर्व खेळाडूंना कोव्हिड चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या परिस्थितीचा आणि राज्यांच्या सीमा पुन्हा बंद झाल्या असल्या, तरी क्रिकेट कार्यक्रमावर त्याचा परिणाम होऊ न देण्यासाठी सर्व उपाय करणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी सीईओ निकल हॉकले यांनी सांगितले.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालेला असून सध्या ते विलगीकरणात आहे. २७ नोव्हेंबरला पहिला एकदिवसीय सामना होत आहे. चार कसोटी सामन्यांतील पहिला सामना १७ डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हल येथे सुरू होत आहे.

संबंधित बातम्या