दर्जेदार प्रशिक्षक शिक्षणाची मदत : बिबियान

दर्जेदार प्रशिक्षक शिक्षणाची मदत : बिबियान
Football

पणजी

ता. २२ (क्रीडा प्रतिनिधी) : देशातील फुटबॉल प्रशिक्षण शिक्षण पद्धती दर्जेदार आहे, त्याची मदत चांगले खेळाडू निवडताना होतो, असे मत भारताच्या १६ वर्षांखालील फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियान फर्नांडिस यांनी व्यक्त केले आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) संकेतस्थळावर ४३ वर्षीय बिबियान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या देशातील ग्रासरूट फुटबॉल पातळीवरील जास्त शिक्षित प्रशिक्षक आहेत आणि त्याचा लाभ होत आहे. देशात प्रशिक्षक शिक्षण पद्धती एआयएफएफने राबविली असून सावियो मदेरा प्रशिक्षक शिक्षणात खूपच छान काम करत असल्याचे बिबियान यांनी नमूद केले आहे. 

‘‘प्रशिक्षक शिक्षण परिवर्तनामुळे या देशात प्रशिक्षक कसे काम करतात याबाबत क्रांती घडली आहे. राज्यस्तरीय अथवा शालेय किंवा ग्रासरूट पातळीवर असो, प्रत्येक पातळीवर चांगले आणि अधिक शिक्षित प्रशिक्षक आहेत,’’ असे बिबियान यांनी सांगितले.

बिबियान हे गोव्यातील माजी फुटबॉलपटू असून राष्ट्रीय १६ वर्षांखालील मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा संघाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मलेशियात दोन वर्षांपूर्वी झालेल्या एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. 

एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताने यंदा उपांत्य फेरी गाठल्यास त्यांना आशिया गटातून १७ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळेल. विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी होईल. २०१७ साली १७ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा भारतात झाली होती, तेव्हा यजमान या नात्याने भारताला थेट खेळण्याची संधी मिळाली होती.

बहारीनमधील स्पर्धेच्या तयारीसाठी कोविड-१९ परिस्थितीनुरूप भारताच्या १६ वर्षांखालील संघाचे सराव शिबिर सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्या भारतीय संघातील खेळाडू आपापल्या घरीच असून प्रशिक्षक बिबियान त्यांच्याशी ऑनलाईन माध्यमाद्वारे संपर्कात आहेत.

खडतर गटात समावेश 

ताश्कंदमध्ये झालेल्या पात्रता स्पर्धेत भारत ब गटात यजमान उझबेकिस्तान, बहारीन व तुर्कमेनिस्तान या संघाविरुद्ध खेळला होता. दोन विजय आणि एका बरोबरीसह सात गुणांची कमाई करत भारताने मुख्य फेरीत स्थान मिळविले. त्यावेळी भारतीय संघाने ११ गोल नोंदविले, तर फक्त एकच गोल स्वीकारला. एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेच्या मुख्य फेरीत भारतासाठी गट क खडतर मानता जातो. ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि उझबेकिस्तान हे गटातील अन्य संघ आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com