आयएसएलमधील आणखी एका मार्गदर्शकास निरोप नॉर्थईस्ट युनायटेडची जेरार्ड नूस यांच्याशी फारकत; जमील अंतरिम प्रशिक्षक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

चांगल्या सुरवातीनंतर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरीत घसरण झालेल्या नॉर्थईस्ट युनायटेडने स्पॅनिश मार्गदर्शक जेरार्ड नूस यांच्याशी फारकत घेतली आहे.

पणजी : चांगल्या सुरवातीनंतर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरीत घसरण झालेल्या नॉर्थईस्ट युनायटेडने स्पॅनिश मार्गदर्शक जेरार्ड नूस यांच्याशी फारकत घेतली आहे.

आयएसएल स्पर्धा सुरू असताना बंगळूर एफसीनंतर प्रशिक्षकास निरोप देणारा नॉर्थईस्ट युनायटेड हा दुसरा संघ आहे. काही दिवसांपूर्वी स्पेनचे कार्ल्स कुआद्रात यांचा करार बंगळूरने संपुष्टात आणला होता.

स्पर्धेतील बाकी साखळी सामन्यांसाठी खालिद जमील यांची मुख्य अंतरिम प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याचेही नॉर्थईस्ट युनायटेडने जाहीर केले आहे. संघाचे सध्याचे डावपेच आणि क्लबचे तत्त्वज्ञान व दृष्टिकोन यांच्यात तफावत असल्यामुळे नूस यांच्यापासून वेगळे होण्याचे ठरविल्याचे गुवाहाटीच्या संघाने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

नूस 35 वर्षांचे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थईस्ट युनायटेडने पहिल्या टप्प्यातील 10 सामन्यांत 2 विजय, 5 बरोबरी व 3 पराभव अशी कामगिरी नोंदविली. दोन यलो कार्डमुळे ते मंगळवारी झालेल्या बंगळूर युनायटेडविरुद्धच्या सामन्यात निलंबित होते. हा सामना 1-1 असा गोलबरोबरीत राहिला. सध्या 11 सामन्यांतून नॉर्थईस्ट युनायटेडचे 12 गुण असून ते सातव्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबई सिटी एफसीला हरविल्यानंतर नॉर्थईस्टने ईस्ट बंगालला हरविले. मात्र नंतर सलग सात सामने हा संघ विजयाविना राहिला.

 

संबंधित बातम्या