एफसी गोवासाठी फातोर्डाच होम ग्राऊंड

किशोर पेटकर
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

एटीके-मोहन बागान, बंगळूर संघासाठीही नेहरू स्टेडियम मुख्य मैदान

पणजी

गोव्यात येत्या नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात एफसी गोवासह एटीके-मोहन बागान व बंगळूर एफसी यांच्यासाठी फातोर्ड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम होम ग्राऊंड असेल.

कोरोना विषाणू महामारीमुळे आगामी आयएसएल स्पर्धा नोव्हेंबरपासून सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत गोव्यातील तीन मैदानावर खेळली जाईल. दहा संघांची स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात असेल. स्पर्धेतील सामने बंद दरवाज्याआड रिकाम्या स्टेडियमवर होतील. २०१९-२० मोसमातील आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीतील क्रमवारीनुसार संघांची तीन मैदानावर होम ग्राऊंडवर विभागणी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

बांबोळी येथील जीएमसी अथलेटिक्स स्टेडियमवर चेन्नईयीन एफसी, मुंबई सिटी एफसी, ओडिशा एफसी व केरळा ब्लास्टर्स यांच्यासाठी, तर वास्को येथील टिळक मैदान जमशेदपूर एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड आणि हैदराबाद एफसी यांच्यासाठी होम ग्राऊंड असेल. याशिवाय गोव्यातच प्रत्येक संघांसाठी प्रत्येकी एक सराव मैदान उपलब्ध असेल.

नियोजित वेळापत्रकानुसार, आगामी आयएसएल स्पर्धा २३ नोव्हेंबरपासून सुरू होईल. एफसी गोवा संघासाठी २०१४ पासून आयएसएल स्पर्धेत फातोर्ड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम होम ग्राऊंड आहे. याच मैदानावर त्यांना २०१५ साली आयएसएल स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार पत्करावी लागली होती. यंदाच्या आयएसएल स्पर्धेत ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखालील संघ ११ सामने फातोर्ड्यात खेळेल. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत लीग विनर्स शिल्ड जिंकून एफसी गोवा संघाने आगामी मोसमातील एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या