‘विंगर’ रेडीम ट्लांगवर एफसी गोवाचा भरवसा

Redeem Tlang
Redeem TlangDainik Gomantak

पणजी

गतमोसमात चमकदार खेळ केलेला ‘विंगर’ रेडीम ट्लांग याला एफसी गोवा संघाने नव्या मोसमासाठी करारबद्ध केले आहे. गोव्यातील संघाने नव्या मोसमासाठी करार केलेला तो पहिला फुटबॉलपटू आहे. त्याच्यावर आता संघाचा भरवसा असेल.

रेडीम २५ वर्षांचा असून तो मेघालयातील शिलाँग येथील आहे. गतमोसमात त्याने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रतिनिधित्व केले होते. आगामी मोसमात तो एफसी गोवासाठी आयएसएल स्पर्धेत, तसेच एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत महत्त्वाचा खेळाडू असेल. नवे स्पॅनिश प्रशिक्षक ज्युआन फरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा खेळेल. एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्रता मिळविलेला हा देशातील पहिलाच फुटबॉल संघ आहे.

‘‘मी खूप आनंदित आहे,’’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया रेडीमने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर दिली. एफसी गोवा संघाचा आपण चाहता असून स्वतःत गौर या टोपणनावाने ओळखेन, असे त्याने नमूद केले. एफसी गोवा संघाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांनी रेडीमच्या गुणवत्तेचे कौतुक केले आहे. मागील दोन मोसमात इंडियन सुपर लीग स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडकडून खेळताना त्याने सर्वांना प्रभावित केले आहे. तो प्रशंसापात्र खेळाडू असल्याचे टंडन यांनी नव्या खेळाडूचे संघात स्वागत करताना सांगितले.

 २०१३ मध्ये पदार्पण

चपळ पायांचा विंगर असलेल्या रेडीम ट्लांग याने २०१३ साली शिलाँग लाजाँगतर्फे आय-लीगमध्ये पदार्पण केले. त्यावर्षी त्याने गोव्याच्या साळगावकर एफसीविरुद्ध फेडरेशन कप स्पर्धेत लाजाँगचे सर्वप्रथम प्रतिनिधित्व केले होते. लाजाँगच्या संघातून काही मोसम यश मिळविल्यानंतर २०१८ पासून तो हायलँडर्स या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या नॉर्थईस्ट संघातील नियमित खेळाडू ठरला. तो संघात असताना २०१८-१९ मध्ये नॉर्थईस्टने आयएसएलच्या प्लेऑफ फेरीत प्रवेश केला होता. गतमोसमात विंगर या नात्याने रेडीमने प्रगती साधताना तीन गोल नोंदविले होते.

 ३५ सामन्यात ४ गोल

आयएसएल स्पर्धेतील दोन मोसमात रेडीम ट्लांग नॉर्थईस्ट युनायटेडकडून ३५ सामने खेळला असून त्याने ४ गोल नोंदविले आहेत. हे सर्व गोल त्याने गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यांत केले आहेत.

‘देशातील काही उत्कृष्ट खेळाडूंसमवेत गोव्यातील उत्कट फुटबॉल चाहत्यांसमोर खेळणे हा एक अद्भूत अनुभव असेल.’’

- रेडीम ट्लांग, एफसी गोवा नवा खेळाडू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com