ISL 2020-21 : पराभवामुळे माजी विजेत्या बंगळूरचे आव्हान संपुष्टात

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

बंगळूर एफसीने कडवी लढत दिली, पण अखेरीस एफसी गोवाचीच सरशी झाली.

पणजी : बंगळूर एफसीने कडवी लढत दिली, पण अखेरीस एफसी गोवाचीच सरशी झाली. इगोर आंगुलो व रेडीम ट्लांग यांनी पूर्वार्धात केलेल्या गोलमुळे सामना 2-1 फरकाने जिंकून सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीनजीक येत गुणतक्त्यात पुन्हा तिसरा क्रमांक मिळविला, तर पराभवामुळे माजी विजेत्या बंगळूरचे आव्हान संपुष्टात आले.

स्पॅनिश आघाडीपटू आंगुलोने 20व्या, तर ट्लांगने 23व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. 33व्या मिनिटास सुरेश वांगजाम याने बंगळूर एफसीची पिछाडी एका गोलने कमी केली. मध्यफळीत लक्षवेधक ठरलेला एफसी गोवाचा ग्लेन मार्टिन्स सामन्याचा मानकरी ठरला. आघाडी टिकवताना एफसी गोवाने उत्तरार्धात बचावात चांगली कामगिरी केली.

INDvsENG: मायकेल वॉनने पाकच्या मैदानाचा फोटो केला शेअर; खेळपट्टीवरून पुन्हा...

हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने आजच्या विजयासह सलग 12 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम साधला. त्यांनी स्वतःच्यात 2014-15 मधील, तसेच यंदा मुंबई सिटी एफसीच्या कामगिरीशी बरोबरी साधली आहे. एकंदरीत एफसी गोवाचा हा 19 सामन्यांतील सातवा विजय ठरला. त्यांचे 30 गुण झाले असून अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील हैदराबाद एफसी व नॉर्थईस्ट युनायटेडपेक्षा तीन गुण जास्त आहेत. एफसी गोवाचा शेवटचा सामना हैदराबादविरुद्ध होईल.

नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूरला स्पर्धेतील 19 लढतीत सातवा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांचे 22 गुण आणि सातवा क्रमांक कायम राहिला. 2017-18 पासून स्पर्धेत खेळणाऱ्या बंगळूर एफसीला प्रथमच  उपांत्य फेरी गाठण्यास अपयश आले आहे.

 

एफसी गोवाची आघाडी

सामन्याचा पूर्वार्ध रंगतदार ठरला. त्यात एफसी गोवाने 2-1 आघाडी प्राप्त केली होती. त्यांनी तीन मिनिटांत दोन गोल केले. दोन्ही वेळेस बंगळूरचा बचाव दबावाखाली खचला. इगोर आंगुलोने ग्लेन मार्टिन्सच्या असिस्टवर डाव्या पायाच्या फटक्यावर गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकविले. यावेळी बंगळूरच्या एरिक पार्तालू याचा संथपणा संघाला भोवला. 37 वर्षीय स्पॅनिश खेळाडूचा हा स्पर्धेतील तेरावा गोल ठरला. लगेच मेघालयातील शिलाँग येथील 25 वर्षीय रेडीम ट्लांग याने एफसी गोवाची आघाडी वाढविली. अलेक्झांडर जेसूराजचा फटका प्रतिस्पर्धी खेळाडूस लागून ट्लांग याच्याकडे आला असता त्याने बंगळूरच्या बचावातील गोंधळाचा लाभ उठविला. 36 व्या मिनिटास आंगुलोचा फटका दिशाहीन ठरल्यामुळे एफसी गोवाची आघाडी मर्यादित राहिली.

 

बंगळूरचा गोल

पूर्वार्धातील कुलिंग ब्रेकनंतर तिसऱ्या मिनिटास क्लेटन सिल्वाच्या असिस्टवर 20 वर्षीय सुरेश वांगजाम याने डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर बंगळूर एफसीची पिछाडी एका गोलने कमी केली. एफसी गोवाच्या सेरिटन फर्नांडिसला मागे टाकत त्याने केलेला गोल प्रेक्षणीय ठरला. त्यानंतर बंगळूरने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न करताना एफसी गोवाच्या बचावावर दबाव वाढविला, पण त्यांना यश मिळाले नाही. विश्रांतीस तीन मिनिटे असताना त्यांनी जवळपास बरोबरी साधली होती, पण क्लेटन सिल्वा याचा हेडर गोलपट्टीस आपटला.

 

हुकलेले प्रयत्न

सामन्याच्या अंतिम टप्प्यात एफसी गोवास आघाडी वाढविण्यासाठी संधी होत्या, पण ईशान पंडिताचा फटका अचूक ठरू शकला नाही, तर महंमद अलीचा हेडर लक्ष्य साधू शकला नाही. गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने अलीच्या हेडिंगवर चेंडूचा अचूक अंदाज बांधत संघावरील संकट टाळले.

दृष्टिक्षेपात...

- इगोर आंगुलो याचे 18 सामन्यांत 13 गोल

- रेडीम ट्लांग याचा एफसी गोवातर्फे 8 सामन्यांत 1 गोल, एकंदरीत 43 आयएसएल सामन्यात 5 गोल

- सुरेश वांगजाम याचा मोसमातील 18 सामन्यांत 1 गोल

- एफसी गोवाचे स्पर्धेत सर्वाधिक 31 गोल

- सलग 12 अपराजित सामन्यांत एफसी गोवाचे 5 विजय, 7 बरोबरी

- बंगळूरविरुद्धच्या 9 लढतीत एफसी गोवाचे 2 विजय, यापूर्वी 2017-18 मोसमात विजयी

- एफसी गोवाविरुद्ध 7 लढतीनंतर बंगळूर एफसी पराजित

- यंदा पहिल्या टप्प्यात उभय संघांत 2-2 गोलबरोबरी

संबंधित बातम्या