नशिबवान 'एफसी गोवा'स विजयाची साथ; गोललाईनच्या आत चेंडू गेल्यानंतरही गोल नाकारल्याने जमशेदपूरची हार

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याचा हेडर इंज्युरी टाईमच्या चौथ्या मिनिटास भेदक ठरला, त्यामुळे नशिबवान एफसी गोवास विजयाची साथ लाभली. याउलट तीन मिनिटे बाकी असताना गोललाईनच्या आता चेंडू पडूनही गोल नाकारलेल्या जमशेदपूर एफसीला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांची अपराजित मालिका खंडित झाली.

पणजी- स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याचा हेडर इंज्युरी टाईमच्या चौथ्या मिनिटास भेदक ठरला, त्यामुळे नशिबवान एफसी गोवास विजयाची साथ लाभली. याउलट तीन मिनिटे बाकी असताना गोललाईनच्या आता चेंडू पडूनही गोल नाकारलेल्या जमशेदपूर एफसीला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांची अपराजित मालिका खंडित झाली.
वास्को येथील टिळक मैदानावर झालेला सामना एफसी गोवाने 2-1 फरकाने जिंकला. सामन्याची तीन मिनिटे बाकी असताना नेरियूस व्हॅल्सकिस याच्या पासवर अलेक्झांडर लिमा याच्या जोरदार फटक्याने एफसी गोवाचा गोलरक्षक महंमद नवाझ याला पूर्णपणे चकविले होते. चेंडू गोलपट्टीला आपटून गोललाईनच्या आत गेल्याचे रिप्लेत दिसले, पण लाईन्समॅन गोल नसल्याचा निर्णय दिल्याने जमशेदपूर संघाला जबरदस्त धक्का बसला. त्यानंतर चार मिनिटांच्या इंज्युरी टाईममध्ये कर्णधार एदू बेदियाच्या कॉर्नर किकवर आंगुलोने अचूक हेडिंग साधले. त्यामुळे लागोपाठच्या दोन पराभवानंतर एफसी गोवास विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाले.

त्यापूर्वी, जमशेदपूर एफसीला नायजेरियन स्टीफन एझे याने 33व्या मिनिटास आघाडी मिळवून दिल्यानंतर स्पॅनिश इगोर आंगुलो याने पेनल्टी फटक्यावर एफसी गोवास 63व्या मिनिटास बरोबरी साधून दिली होती.

एफसी गोवाचा हा आठ लढतीतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता 11 गुण झाले असून पाचवा क्रमांक मिळाला आहे. नॉर्थईस्ट युनायटेडचे 11 गुण आहेत, त्यांची गोलसरासरी सरस असल्याने चौथा क्रम आहे. सलग सहा सामने (2 विजय, 4 बरोबरी) राहिल्यानंतर जमशेदपूरला स्पर्धेतील एकंदरीत दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे आठ लढतीनंतर 10 गुण कायम राहिले व एका क्रमांकाची घसरण होऊन सहावा क्रमांक मिळाला.

पूर्वार्धातील कुलिंग ब्रेकनंतरच्या तिसऱ्याच मिनिटास जमशेदपूरने आघाडी घेतली. एका सामन्यातील निलंबन संपवून पुनरागमन करणाऱ्या स्पॅनिश एतॉर मॉनरॉयच्या शानदार फ्रीकिकवर नायजेरियन स्टीफन एझे याने गोलपोस्टच्या अगदी जवळून हवेत झेपावत उजव्या पायाने चेंडूला नेटची दिशा दाखविली.
तासाभराच्या खेळानंतर पेनल्टी फटक्यावर एफसी गोवाने बरोबरी साधली. इगोर आंगुलो याने आयएसएलमधील वैयक्तिक सातवा गोल नोंदविताना गोलरक्षक टीपी रेहेनेश याचा अंदाज साफ चुकविला. जमशेदपूरच्या अलेक्स लिमा याने गोलक्षेत्रात एफसी गोवाचा ऑस्ट्रेलियन बचावपटू जेम्स डोनाची याला पाडल्यानंतर रेफरी ए. रोवन यांनी पेनल्टी फटक्याची खूण केली होती. स्पॉटकिकवरून आंगुलो याचा डाव्या पायाचा फटक अचूक ठरला.

त्यापूर्वी 57व्या मिनिटास एफसी गोवास गोल करण्याची सोपी संधी होती, पण जोर्जे ओर्तिझ याचा फटका रेहेनेशने अडविला. त्याअगोदर, आंगुलो याने समोर फक्त गोलरक्षक असताना फटका दिशाहीन मारल्यामुळे एफसी गोवास बरोबरी साधता आली नव्हती. 52व्या मिनिटास अनिकेत जाधव याचा धोकादायक फटका गोलरक्षक महंमद नवाझ याने वेळीस उधळून लावल्यामुळे जमशेदपूरला दोन गोलची आघाडी मिळाली नाही. सत्तराव्या मिनिटास नेरियूस व्हॅल्सकिस याचा नेम चुकल्यामुळे जमशेदपूरला आघाडीपासून दूर राहावे लागले.

दृष्टिक्षेपात- 
- जमशेदपूरचा नायजेरियन बचावपटू स्टीफन एझे याचे यंदाच्या आयएसएलमध्ये 2 गोल
- एफसी गोवाचा स्पॅनिश स्ट्रायकर इगोर आंगुलो याचे आयएसएलमध्ये सर्वाधिक 8 गोल
- आंगुलोचे यंदा तिसऱ्यांदा सामन्यात 2 गोल
- यंदाच्या आयएसएलमध्ये 19 पेनल्टी फटके, त्यापैकी 14 गोल
- आयएसएलमधील 7 लढतीत एफसी गोवाचे जमशेदपूरवर 4 विजय
- यंदाच्या आयएसएलमध्ये एफसी गोवा 10, जमशेदपूरचे 9 गोल

संबंधित बातम्या