ISL : ओर्तिझच्या धडाक्यासह एफसी गोवाची प्रगती कायम 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

ओळीने चौथ्या विजयासह तिसऱ्या क्रमांकावर;  जमशेदपूरचा सलग दुसरा पराभव

पणजी : आक्रमणाचा भार पेलण्याची संधी लाभलेल्या जोर्जे ओर्तिझने जबाबदारी यशस्वीपणे पेलताना दोन गोल केले, त्या बळावर एफसी गोवाने ओळीने चौथा विजय नोंदवत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली. त्यांनी `टेन मेन` जमशेदपूर एफसीवर 3 - 0 फरकाने मात केली.

ईपीएल : पॉल पोग्बाच्या एकमेव गोलमुळे मँचेस्टर युनायटेडचा बर्नले वर विजय 

सामना गुरुवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्याच्या पूर्वार्धात 19 व्या मिनिटास स्पॅनिश खेळाडू जोर्जे ओर्तिझ याने एफसी गोवास अपेक्षित सुरवात करून दिली. त्यानेच दुसरा गोल 52व्या मिनिटास करून संघाची स्थिती आणखीनच भक्कम केली. 89व्या मिनिटास इव्हान गोन्झालेझ याने संघाचा तिसरा गोल केला. त्यापूर्वी 86 व्या मिनिटास जमशेदपूरचा एक खेळाडू कमी झाला. सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे अलेक्झांडर लिमा याला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले.

सामन्यात चेंडूवर अधिकप्रमाणात वर्चस्व राखलेल्या एफसी गोवाचा हा 11 लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यांनी पहिल्या टप्प्यातही जमशेदपूरला हरविले होते. ज्युआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आता 18 गुण झाले आहेत. मुंबई सिटी एफसी (25 गुण) व एटीके मोहन बागान (20 गुण) यांच्यानंतर त्यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. एकंदरीत 11 सामन्यांत चौथा सामना गमावल्यामुळे त्यांचे 13 गुण कायम राहिले आहेत. त्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

ओर्तिझचा पूर्वार्धात गोल

स्पॅनिश खेळाडू जोर्जे ओर्तिझ याने एफसी गोवास आघाडी मिळवून दिली. त्याने गोल केला, पण श्रेय त्याचा देशवासीय आल्बर्टो नोगेरा याला जाते. तीस वर्षीय नोगेराने उजव्या बाजूने सुरेख चाल रचत जमशेदपूरच्या रिकी लाल्लॉमॉमा याला गुंगारा दिला, नंतर गोलक्षेत्रात मध्यभागी असलेल्या ओर्तिझ याला संधी प्राप्त करून दिली. यावेळी 28 वर्षीय खेळाडूने सणसणीत फटक्यावर संघाचे गोलखाते उघडले. यावेळी जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश चेंडू अडविण्यासाठी उजव्या बाजूने झेपावला, पण फटक्याचा वेग त्याला भारी ठरला.

 

उत्तरार्धात आघाडीत वाढ

विश्रांतीनंतरच्या सातव्या मिनिटास ओर्तिझ पुन्हा एकदा अचूक नेमबाजी साधत एफसी गोवाची आघाडी वाढविली. यावेळेसही आल्बर्टो नोगेरा याने ब्रँडन फर्नांडिसला गोलक्षेत्रात पास दिला. ब्रँडनने वेळ न दवडता अनमार्क असलेल्या ओर्तिझ याला सुरेख क्रॉसपास पुरविला. स्पॅनिश खेळाडूने गोलरक्षक रेहेनेशला चकवा देण्याचे काम शांतपणे पूर्ण केले. या गोलनंतर चार मिनिटांनी ओर्तिझला अचूक नेम साधता आला नाही, त्यामुळे तो हॅटट्रिकपासून दूर राहिला. त्यानंतर सामना संपण्यास सोळा मिनिटे असताना ओर्तिझला आणखी एक फटका रेहेनेश थेट अडविला. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना आल्बर्टो नोगेराच्या असिस्टवर बचावपटू इव्हान गोन्झालेझ याने रेहेनेश याला चेंडू रोखण्याची संधी दिली नाही.

 

निर्णायक बदल

एफसी गोवाचे प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी आज सुरवातीच्या संघात दोन महत्त्वपूर्ण बदल केले. नऊ गोल केलेला हुकमी आघाडीपटू इगोर आंगुलो याला राखीव फळीत ठेवले. त्यामुळे आक्रमणाचा भार जोर्जे ओर्तिझ याला वाहावा लागला. मागील दहा सामने गोलरक्षण केलेला महंमद नवाझ याच्या जागी नवीन कुमार याला संधी मिळाली. नवीनने जमशेदपूरची आक्रमणे रोखताना पूर्वार्धात लक्षणीय एकाग्रता प्रदर्शित केली. तोच सामन्याचा मानकरी ठरला. सामना संपण्यास बारा मिनिटे असताना नवीनने चपळाई दाखवत जॅकिचंदचा प्रयत्न फोल ठरविला होता.

 

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाच्या जोर्जे ओर्तिझ याचे 11 आयएसएल लढतीत 4 गोल

- ओर्तिझचे यापूर्वी केरळा ब्लास्टर्स व चेन्नईयीन एफसीविरुद्ध प्रत्येकी 1 गोल

- इव्हान गोन्झालेझचा 10 सामन्यात 1 गोल

- पहिल्या टप्प्यातही एफसी गोवाची जमशेदपूरवर 2-1 फरकाने मात

- एफसी गोवाचे यंदाच्या स्पर्धेत आता 16 गोल

- एफसी गोवाच्या यंदा 2 क्लीन शीट्स
 

संबंधित बातम्या