एफसी गोवा एफसी ओडिशाविरूद्ध एका गोलने विजयी

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत काल ओडिशा एफसीवर निर्विवाद वर्चस्व राखले, पण त्यांना एका गोलच्या विजयावर समाधान मानावे लागले.

पणजी :  एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत काल ओडिशा एफसीवर निर्विवाद वर्चस्व राखले, पण त्यांना एका गोलच्या विजयावर समाधान मानावे लागले. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर सामना झाला. स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलोने 45+1 व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. त्यामुळे एफसी गोवास यंदाच्या स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविता आला. या 36 वर्षीय स्ट्रायकरचा आयएसएलच्या सातव्या मोसमातील हा सहावा गोल ठरला. एफसी गोवाने सामन्यावर 66 टक्के वर्चस्व राखताना एकूण 679 पासेसची नोंद केली. ज्युआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आता पाच लढतीतून आठ गुण झाले आहेत. त्यांचा हा दुसरा विजय ठरला. त्यांना आता चौथा क्रमांक मिळाला आहे. स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा संघ अजून विजयाविना आहे. पाच लढतीत त्यांना चौथा पराभव पत्करावा लागला असून एक गुण कायम राहिला. ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याच्या दक्षतेमुळे एफसी गोवाचा विजयी फरक एका गोलपुरता मर्यादित राहिला. एफसी गोवाचा मध्यरक्षक जॉर्जे ओर्टिझ सामन्याचा मानकरी ठरला.

 

 

पूर्वार्धातील इंज्युरी टाईममधील पहिल्याच मिनिटास एफसी गोवाचा स्पॅनिश शार्प शूटर इगोर आंगुलो याने गोलशून्य बरोबरीचा कोंडी फोडली. अलेक्झांडर रोमारियो जेसूराज याने डाव्या भागातून दिलेल्या सुरेख पासवर आंगुलोने ओडिशाचा बचावपटू जेकब ट्रॅट याला गुंगारा देत डाव्या पायाच्या फटक्यावर गोल केला. एका गोलच्या पिछाडीवरून उत्तरार्धाच्या सुरवातीस ओडिशाने आक्रमणावर भर दिला, मात्र त्यात भेदकतेचा अभाव होता. एफसी गोवाच्या मध्यफळीत ब्रँडन फर्नांडिस आणि जॉर्जे ओर्टिझ यांच्यात सुरेख समन्वय दिसला. त्यामुळे ओडिशाची बचावफळीत वारंवार दबावाखाली येत होती. सामन्याच्या 28व्या मिनिटास ब्रँडन फर्नांडिसने चांगली मुसंडी मारली होती, पण कोल अलेक्झांडर दक्ष राहिल्याने एफसी गोवाची संधी हुकली. त्यानंतर ३४व्या मिनिटास एफसी गोवाच्या सेरिटन फर्नांडिसने वेळीच हालचाली केल्यामुळे ओडिशाच्या जेरी माविमिंगथांगा सफल ठरू शकला नाही. एफसी गोवाचे आज लेनी रॉड्रिग्ज याने एदू बेदियाच्या अनुपस्थितीत नेतृत्व केले.

 

 

ओडिशाच्या जेरी माविमिंगथांगा याचा खेळ उल्लेखनीय होता. 69व्या मिनिटास त्याला आणखी एक संधी होती, मात्र एफसी गोवाच्या सेवियर गामा त्याच्यावर सक्त पहारा राखला. 74व्या मिनिटास एफसी गोवाची आघाडी जवळपास दोन गोलांची झाली होती, पण समोर गोलरक्षक असताना आंगुलो चेंडूवर योग्य नियंत्रण राखू शकला नाही. प्रिन्सटन रिबेलोने स्पॅनिश आघाडीपटूस सुरेख पास दिला होता. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना गोल स्कोअरर आंगुलोची जागा एदू बेदियाने घेतली. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना एफसी गोवाची आणखी एक संधी वाया गेल्यामुळे आघाडी एका गोलपुरतीच मर्यादित राहिली.

 

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाचे सातव्या मोसमातील 5 लढतीत 7 गोल

- इगोर आंगुलोचे सर्वाधिक 6 गोल

- ओडिशा सलग 3 लढतीत गोलविना

- आयएसएलमध्ये एफसी गोवाचे ओडिशावर ओळीने 3 विजय

- मोसमात प्रथमच एफसी गोवाची क्लीन शीट

 

अधिक वाचा :

विराट कोहली हा जणू ऑस्ट्रेलियनच आहे...!

आयएसएलमध्ये  हैदराबाद एफसीची विजयी घौडदौड सुरूच ;  एटीके मोहन बागानला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले

संबंधित बातम्या