पिछाडीवरून मुसंडी मारत 'एफसी गोवा'चा झुंजार विजय ; बलाढ्य हैदराबादला 2-1 फरकाने हरवून वर्षाची अखेर विजयाने

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल पिछाडीवरून जबरदस्त मुसंडी मारत झुंजार विजय साकारला. सुपर सब ईशान पंडिता आणि हुकमी स्ट्रायकर इगोर आंगुलो यांनी अंतिम टप्प्यात केलेल्या दोन गोलमुळे गोव्याच्या संघाने हैदराबादला 2-1 फरकाने हरवून वर्षाची अखेर विजयाने केली.

पणजी :  एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल पिछाडीवरून जबरदस्त मुसंडी मारत झुंजार विजय साकारला. सुपर सब ईशान पंडिता आणि हुकमी स्ट्रायकर इगोर आंगुलो यांनी अंतिम टप्प्यात केलेल्या दोन गोलमुळे गोव्याच्या संघाने हैदराबादला 2-1 फरकाने हरवून वर्षाची अखेर विजयाने केली व गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती केली.सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. स्पॅनिश आघाडीपटू आरिदाने सांताना याने 58व्या मिनिटास हैदराबादला आघाडी मिळवून दिली. सेरिटन फर्नांडिसच्या जागी एक मिनिट अगोदर मैदानात उतरलेल्या 22 वर्षीय पंडिता याने 87व्या मिनिटास कर्णधार एदू बेदियाच्या फ्रीकिकवर भेदक हेडिंग साधले. त्यानंतर 90+1व्या मिनिटास इगोर आंगुलो याने एफसी गोवास निर्णायक आघाडी मिळवून दिली. आंगुलोने जमशेदपूरविरुद्धही इंज्युरी टाईममध्ये विजयी गोल केला होता. बुधवारी त्याने अल्बर्टो नोगेराचे असिस्ट फलदायी ठरवत यंदाचा नववा गोल केला. आंगुलो सामन्याचा मानकरी ठरला.

एफसी गोवाचा हा नऊ लढतीतील चौथा विजय असून त्यांचे 14 गुण झाले आहेत. एटीके मोहन बागान (17 गुण) व मुंबई सिटी (16 गुण) यांच्यानंतर त्यांचा क्रम आहे. हैदराबादला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांचे आठ लढतीतून नऊ गुण आणि आठवा क्रम कायम राहिला. आरिदाने सांताना याने तासाभराच्या खेळापूर्वी हैदराबादच्या प्रयत्नास यश मिळवून दिले. स्पॅनिश खेळाडूने मोसमातील पाचवा गोल नोंदविताना मैदानाच्या उजव्या कोपऱ्यातून आशिष राय याने दिलेल्या सुरेख क्रॉस पासवर भेदक हेडिंग साधत एफसी गोवाचा गोलरक्षक महंमद नवाझ याला हतबल ठरविले. त्यानंतर लगेच सांतानास आणखी एक गोल करण्याची चांगली संधी होती, यावेळी त्याचा फटका गोलरक्षक नवाझ याच्या बोटांना लागून नंतर गोलपट्टीस आपटला व बाहेर गेला. सामना संपण्यास 19 मिनिटे असताना सांतानाचे हेडिंग अचूक ठरले, पण लाईन्समननी ऑफसाईडची खूण केल्यामुळे हैदराबादची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

पूर्वार्धात दोन्ही संघांनी विशेष धोका न पत्करता, प्रतिस्पर्ध्यांचे कच्चे दुवे हेरण्यावर भर दिला. अनुभवी मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्जने एफसी गोवा संघात पुनरागमन केले. सामन्याच्या दहाव्या मिनिटास एफसी गोवाचा ऑस्ट्रेलियन बचावपटू जेम्स डोनाची याने नेटच्या दिशेने हेडिंग साधले, पण नेम चुकला. पहिल्या पंचेचाळीस मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांच्या बचावफळीने कामगिरी चोख बजावली, त्यामुळे आक्रमकांना विशेष संधी मिळाली नाही. विश्रांतीनंतरच्या पाचव्या मिनिटास हैदराबादच्या मेहनती आकाश मिश्रा याने मुसंडी मारली होती, मात्र त्याच्या फटक्याच्या नेम अचूक ठरला नाही. त्यानंतर चार मिनिटांनी समोर केवळ गोलरक्षक महंमद नवाझ असताना हैदराबादच्या जुवाव व्हिक्टर याने कमजोर फटका थेट गोलरक्षकाच्या हाती मारला. सामना संपण्यास वीस मिनिटे बाकी असताना एफसी गोवास बरोबरी साधता आली नाही. ब्रँडन फर्नांडिसने मैदानाच्या उजव्या बाजूतून दिलेल्या अप्रतिम क्रॉस पासवर समोर केवळ गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी असताना जोर्जे ओर्तिझ याला वेळीच चेंडूपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही.

 

दृष्टिक्षेपात...

-एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे यंदाच्या स्पर्धेत सर्वाधक 9 गोल

- हैदराबादचा स्पॅनिश स्ट्रायकर आरिदाने सांताना याचे मोसमात 5 गोल

- मूळ जम्मू-काश्मीरचा, पण स्पेनमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळलेल्या ईशान पंडिताचा पहिलाच आयएसएल गोल

- एफसी गोवाचे आता हैदराबादवर सलग 3 विजय, गतमोसमात 2 लढतीत बाजी

- एफसी गोवाचे स्पर्धेत सर्वाधिक 12 गोल

 
 

संबंधित बातम्या