AFC Champions 2021: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित

AFC Champions 2021: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित
edu bediya captain fc goa.

पणजी:  आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सलग दोन सामने क्लीन शीट राखलेल्या लढवय्या एफसी गोवाचा बचाव अखेर पर्सेपोलिस संघाने मंगळवारी भेदला. एदू बेदियाचा भारतीय क्लबतर्फे ऐतिहासिक गोल, तसेच गोलरक्षक धीरज सिंगने पेनल्टी फटका रोखूनही इराणच्या मातब्बर संघाने 2-1 फरकाने बाजी मारत ई गटात सलग तिसरा विजय नोंदविला आणि अव्वल स्थानही राखले. एफसी गोवास दोन बरोबरीनंतर पहिला पराभव पत्करावा लागला. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहलाल नेहरू स्टेडियमवर झाला. (FC Goa breaks winning streak)

कर्णधार स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याने 14व्या मिनिटास केलेल्या हेडिंग गोलमुळे एफसी गोवाने आघाडी मिळविली, पण नंतर मेहदी तोराबी याने 18व्या मिनिटाल अचूक पेनल्टी फटका मारल्यामुळे पर्सेपोलिस संघाने बरोबरी साधली. यावेळी एफसी गोवाचा ऑस्ट्रेलियन बचावपटू जेम्स डोनाकी याने प्रतिस्पर्धी खेळाडूस मागून धक्का दिला होता. एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग याने स्पर्धेत 198व्या मिनिटास अखेर पहिला गोल स्वीकारला. नंतर 24व्या मिनिटास कर्णधार जलाल होसेनी याचे हेडिंग भेदक ठरल्यामुळे पर्सेपोलिस संघाच्या खाती 2-1 आघाडी जमा झाली. मेहदी तोराबी याच्या शानदार क्रॉस पासवर हा गोल झाला. होसेनी याचा हा स्पर्धेतील दुसरा गोल ठरला.

जबदरस्त फॉर्म असलेला एफसी गोवाचा मणिपुरी गोलरक्षक धीरज सिंगने 41व्या मिनिटास पर्सेपोलिस संघाच्या होसेन कनानी याचा पेनल्टी फटका अचूक अंदाज बांधत अडविला, तर 38व्या मिनिटास धीरजने वाहिद आमिरी याचा फटका अगदी जवळून रोखल्यामुळे पर्सेपोलिस संघाची पूर्वार्धात आघाडी आणखी वाढू शकली नाही.

भारतीय क्लबतर्फे ऐतिहासिक गोल

एफसी गोवाचा कर्णधार एदू बेदिया याने संघाला आघाडी मिळवून देणारे शानदार हेडिंग साधले. हा गोल ऐतिहासिक ठरला. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत भारतीय क्लबतर्फे पहिला गोल नोंदविण्याचा विक्रम एफसी गोवाच्या नावे नोंदीत झाला. ब्रँडन फर्नांडिसने मारलेल्या सणसणीत फ्रीकिक फटक्यावर 32 वर्षीय स्पॅनिश मध्यरक्षकाने हेडिंगने अचूक नेम साधला. 

अल वाहदाचा जबरदस्त विजय
त्यापूर्वी, पहिला विजय नोंदविताना संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबने जबरदस्त मुसंडी साधली. 90+5व्या मिनिटास फारेस जुमा याने नोंदविलेल्या गोलमुले अल वाहदा क्लबने कतारच्या अल रय्यान क्लबला 3-2 फरकाने हरविले. शोजा खलिलझादेह (13वे मिनिट) व अब्दुलअझिझ हातेम (54वे मिनिट) यांनी केलेल्या गोलमुळे अल रय्यान क्लब आघाडीवर होता. नंतर अल वाहदा क्लबसाठी मायेद अल रुवैस याने 66व्या, तर खलिल इब्राहिम याने 85व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे अल वाहदा क्लबने बरोबरी साधली होती.

 दृष्टिक्षेपात ई गट...
- प्रत्येकी 3 लढतीनंतर पर्सेपोलिस एफसीचे 9, अल वाहदाचे 4, एफसी           गोवाचे 2, तर अल रय्यानचा 1 गुण
- शुक्रवार तारीख 23 एप्रिल रोजी अल रय्यान विरुद्ध अल वाहदा, तर एफसी     गोवा विरुद्ध पर्सेपोलिस यांच्यात परतीची लढत
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com