एफसी गोवाची विजयाची प्रतीक्षा संपली ; केरळा ब्लास्टर्सला 3-1 फरकाने हरविले

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 डिसेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील एफसी गोवाची विजयासाठीची प्रतीक्षा अखेर काल संपुष्टात आली. स्पॅनिश खेळाडू इगोर आंगुलोचे दोन आणि जॉर्ज ऑर्टिझ याच्या एका गोलच्या बळावर त्यांनी वर्चस्वासह केरळा ब्लास्टर्सला 3-1 फरकाने हरविले.

पणजी :  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील एफसी गोवाची विजयासाठीची प्रतीक्षा अखेर काल संपुष्टात आली. स्पॅनिश खेळाडू इगोर आंगुलोचे दोन आणि जॉर्ज ऑर्टिझ याच्या एका गोलच्या बळावर त्यांनी वर्चस्वासह केरळा ब्लास्टर्सला 3-1 फरकाने हरविले. पाच मिनिटांच्या इंज्युरी टाईम खेळात केरळास दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

 

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सामन्याच्या 30व्या मिनिटास इगोर आंगुलो याने एफसी गोवाचे गोल खाते उघडले, नंतर 52व्या मिनिटास जॉर्ज ऑर्टिझ याने आघाडी वाढविली. आंगुलोने इंज्युरी टाईममधील तिसऱ्या मिनिटास आणखी गोल एक करून एफसी गोवाचा विजय पक्का केला. आंगुलोने आता आयएसएलच्या सातव्या मोसमात सर्वाधिक पाच गोल केले आहेत. ९०व्या मिनिटास व्हिन्सेंट गोमेझ याने केरळा ब्लास्टर्सची पिछाडी एका गोलने कमी केली. इंज्युरी टाईमच्या पहिल्याच मिनिटास केरळा ब्लास्टर्सचा झिंबाब्वेयन बचावपटू कॉस्ता न्हामोईनेसू याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले.

 

स्पर्धेतील पहिल्या विजयामुळे आता ज्युआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाचे चार लढतीतून पाच गुण झाले आहेत. ते आता चौथ्या स्थानी आले आहेत. याअगोदर दोन बरोबरी आणि एक पराभव एफसी गोवाच्या खाती होता. किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्स स्पर्धेतील चौथ्या लढतीनंतरही विजयाविना राहिला. दुसऱ्या पराभवामुळे त्यांचे दोन गुण कायम राहिले. त्यांचे दोन सामने बरोबरीत राहिले आहेत. ते आता नवव्या स्थानी आहेत. केरळच्या संघाला हुकमी मध्यरक्षक सर्जिओ सिदोन्चा याची अनुपस्थिती जाणवली.

 

सेवियर गामा याच्या असिस्टवर आंगुलोने एफसी गोवास आघाडी मिळवून दिली. यावेळी गोलरक्षक आल्बिनो गोम्सने जागा सोडण्याची चूक केली, त्याचा फायदा आंगुलोने उठवताना गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला नेटची दिशा दाखविली. विश्रांतीनंतरच्या सातव्या मिनिटास ऑर्टिझने यंदाच्या आयएसएलमधील आपला पहिला गोल नोंदविला. ब्रँडन फर्नांडिसच्या असिस्टवर स्पॅनिश विंगरने केरळाचा बचावपटू कॉस्ता न्हामोईनेसू याला गुंगारा देत नंतर चेंडूवर पूर्ण नियंत्रण राखत गोलरक्षकालाही सावरण्याची संधी दिली नाही.

 

पूर्वार्धात दहाव्या मिनिटास ऑर्टिझला सुरेख संधी होती, पण त्याचा सणसणीत फटका गोलपट्टीस आपटल्यामुळे एफसी गोवा आघाडीपासून दूर राहिला. त्यापूर्वी पूर्वार्धातील इंज्युरी टाईममध्ये ऑर्टिझचा गोल ऑफसाईड ठरला होता. 47व्या मिनिटास एफसी गोवाच्या अलेक्झांडर जेसूराज प्रयत्न फोल ठरवत गोलरक्षक आल्बिनोने केरळा ब्लास्टर्सवरील संकट टाळले होते.

 

दृष्टिक्षेपात...

- यंदाच्या आयएसएलमध्ये इगोर आंगुलोचे 4 लढतीत 5 गोल

- आयएसएलमध्ये एफसी गोवाचा जॉर्ज ऑर्टिझ आणि केरळा ब्लास्टर्सचा व्हिन्सेंट गोमेझ यांच्या खाती 1 गोल

- आयएसएलमध्ये एफसी गोवा व केरळा ब्लास्टर्स यांच्यात 13 लढती

- एफसी गोवाचे 9 विजय, केरळा ब्लास्टर्स 3 लढतीत विजयी, 1 बरोबरी

- केरळा ब्लास्टर्सविरुद्ध एफसी गोवा सलग 7 सामन्यांत अपराजित

- एफसी गोवाचे 407, तर केरळा ब्लास्टर्सचे 328 पास

 
जडेजा प्रकरणावरून एवढी चर्चा कशाला : सुनिल गावसकर

आयएसएलमध्ये आज एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स आमनेसामने, दुसऱ्या सामन्यात ओडिशा एफसी देणार मुंबई सिटीला टक्कर - 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजा जखमी झाल्यावर  फिजिओ मैदानावर न आल्याने संजय मांजरेकरांचा आक्षेप

संबंधित बातम्या