चुकांमुळे एफसी गोवाचे प्रशिक्षक निराश

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील लागोपाठच्या दुसऱ्या पराभवानंतर एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो कमालीचे निराश आहेत.

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील लागोपाठच्या दुसऱ्या पराभवानंतर एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो कमालीचे निराश आहेत. आपल्या संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली, खूप चुका केल्या अशी कबुली त्यांनी चेन्नईयीन एफसीविरुद्धच्या पराभवानंतर दिली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी रात्री झालेल्या लढतीत एफसी गोवास चेन्नईयीन एफसीकडून 1-2 फरकाने हार पत्करावी लागली. हा त्यांचा स्पर्धेतील एकंदरीत तिसरा पराभव ठरला.

``सामन्यातील कामगिरीने मी निराश आहे. आम्ही अपेक्षेनुसार खेळलो नाही, खूप चुका केल्या. काही खेळाडू दमले आहेत. आता पुन्हा सावरणे महत्त्वाचे आहे. काही वेळा आम्ही पहिले अकरा जण ठरवतो, पण या परिस्थितीत ते शक्य नाही. हे निमित्त नाही, पण सत्यस्थिती आहे,`` असे फेरांडो सामन्यानंतर म्हणाले. आयएसएलच्या सातव्या मोसमातील व्यस्त वेळापत्रकाविषयी अगोदरच फेरांडो यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. एटीके मोहन बागानविरुद्धच्या पराभवानंतर, खेळाडू मशिन नाहीत, ते मानव आहेत, अशी प्रतिक्रिया या स्पॅनिश प्रशिक्षकाने दिली होती.

पुढील लढतीनंतर खेळाडूंशी चर्चा करणे आवश्यक आहे, असे फेरांडो यांनी नमूद केले. एफसी गोवाचा आगामी सामना बुधवारी (ता. 23) जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल. सात सामन्यांत दोन विजय, दोन बरोबरी, तीन पराभवासह आठ गुण मिळवून एफसी गोवा सातव्या स्थानी आहे.

आकडेवारीत सरस, तरीही...

चेन्नईयीनविरुद्धच्या लढतीत आकडेवारीस सरस ठरूनही एफसी गोवास पराभव पत्करावा लागला. सामन्यात एफसी गोवाने चेंडूवर 58 टक्के, तर चेन्नईयीनने 42 टक्के ताबा राखला. एफसी गोवाचे पासेसही जास्त होते. त्यांच्या 481 पासेसच्या तुलनेत चेन्नईयीनने 294 पासेसची नोंद केली.

आणखी वाचा:

विराट कोहली म्हणाला.. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिली कसोटी आम्ही फलंदाजांमुळे हरलो -

 
 

संबंधित बातम्या