FC Goa VS ATK Mohun Bagan: ISL फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाची विजयी दौड कायम

आयएलएल: एटीके मोहन बागानविरुद्ध अखेर विजय साकारला
FC Goa
FC GoaDainik Gomantak

पणजी: 'एफसी गोवा' संघाला इंडियन सुपर लीग ( ISL ) फुटबॉल स्पर्धेतील सलग चार लढतीत एटीके मोहन बागानविरुद्ध विजय नोंदविता आला नव्हता, मात्र त्यांनी रविवारी रात्री फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर या परंपरेस छेद दिला. या सामन्यात वर्चस्व राखताना उत्तरार्धातील खेळात तीन गोल नोंदवून त्यांनी घरच्या मैदानावरील सलग दुसरा, तर एकंदरीत चौथा विजय नोंदविला.

(FC Goa defeated ATK Mohun Bagan in the Indian Super League football tournament)

ऐबान्भा डोहलिंग याने 50 व्या, बदली खेळाडू सीरियन महम्मद फारेस अरनौत याने 76 व्या, तर आणखी एक बदली खेळाडू नोआ सदावी याने 82 व्या मिनिटास केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे एफसी गोवाने 3-0 फरकाने विजय प्राप्त केला.

याच गोलफरकाने फातोर्ड्यात एफसी गोवाने जमशेदपूरला हरविले होते. एफसी गोवाचे आता सगा लढतीनंतर 12 गुण झाले असून तिसऱ्या क्रमांकापर्यंत उडी घेतली. एटीके मोहन बागानला दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे सहा लढतीनंतर त्यांचे 10 गुण कायम राहिले. त्यांची आता सहाव्या स्थानी घसरण झाली.

जोरदार आक्रमण

विश्रांतीपूर्वी एटीके मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथ याच्या दक्ष कामगिरीमुळे एफसी गोवास गोल नोंदविता आला नाही. कैथने किमान चार वेळा एफसी गोवा संघाला गोल नोंदविण्यापासून दूर ठेवले. मात्र एफसी गोवाने गोलशून्य पूर्वार्धानंतर आक्रमण आणखी धारदार केले. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर पाचव्याच मिनिटास यजमान संघाला यश मिळाले.

अन्वरी अलीच्या शानदार असिस्टवर डोहलिंग याने मैदानाच्या डाव्या बाजूने कठीण कोन साधत चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली. यावेळी त्याने प्रतिस्पर्धी खेळाडू आशिष राय याला कल्पकतेने गुंगारा दिला. तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन केलेल्या फारेस याने 65 व्या मिनिटास मार्क व्हालेंते याची जागा घेतली आणि 11 मिनिटानंतर एफसी गोवातर्फे वैयक्तिक पहिला गोल केला. एदू बेदियाच्या कॉर्नर फटक्यावर सीरियन खेळाडूचा नेम अचूक ठरला. यावेळी गोलरक्षक कैथचा अंदाज पूर्णतः चुकला.

FC Goa
I-League Football: 'चर्चिल ब्रदर्स'ला नमवत 'श्रीनिदी डेक्कन'ची विजयी सलामी

गोलचा जल्लोष आणि यलो कार्ड

जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या नोआ सदावी याला प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी 74 व्या मिनिटास अल्वारो वाझकेझ याच्या जागी मैदानात धाडले. नोआ याने मोसमातील चौथा गोल नोंदविताना प्रेक्षणीय फटका अचूक ठरविला.

अन्वर अलीच्या असिस्टवर मोरोक्कन खेळाडूने 35 यार्डावरून ताकदवान फटका मारला. चेंडू गोलरक्षक कैथच्या हाताला लागला, पण तो फटका रोखू शकला नाही. गोल केल्यानंतर त्याने मैदानातच जर्सी काढून आनंद व्यक्त केला, त्याबद्दल त्याला रेफरीने यलो कार्ड दाखविले.

FC Goa
Goa U25's Cricket: 'मनीष'ची एकाकी झुंज व्यर्थ; चुरशीच्या सामन्यात झारखंडची सरशी

दृष्टिक्षेपात सामना

  • एटीके मोहन बागानविरुद्ध 5 व्या लढतीत एफसी गोवा विजयी

  • यापूर्वी एटीके मोहन बागानचे एफसी गोवाविरुद्ध 3 विजय, 1 बरोबरी

  • मोसमात एफसी गोवाच्या आता 3 क्लीन शीट

  • एटीके मोहन बागानला प्रथमच गोल नोंदविण्यात अपयश

  • एफसी गोवाच्या नोआ सदावी याचे स्पर्धेत 4 गोल

  • ऐबान्भा डोहलिंग याने केलेला गोल यंदा स्पर्धेतील 100 वा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com