एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघात उपयुक्त त्रिकुट कायम

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

एफसी गोवाने करार वाढविल्याबद्दल नेस्टर, कपिल व लेस्ली यांनी आनंद व्यक्त केला आहे. आपल्यासाठी हे नवे आव्हान असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेणार असल्याचे नेस्टरने नमूद केले.

पणजी

एफसी गोवाने आपल्या डेव्हलपमेंट संघात उपयुक्त ठरलेल्या नेस्टर डायस, लेस्ली रिबेलो व कपिल होबळे या त्रिकुटास कायम राखताना त्यांच्या करारात वाढ केली आहे.

नेस्टर व कपिल यांचा करार २०२२ पर्यंत, तर लेस्लीचा करार २०२३ पर्यंत असेल. या तिघांनी एफसी गोवाच्या युवा विकास उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जीएफएच्या २० वर्षांखालील स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या संघात लेस्लीने मोलाचा वाटा उचलला होता. २०१९ साली एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघाने गोवा प्रो-लीग व पोलिस कप जिंकला, त्या यशात कपिल व नेस्ट यांनी उल्लेखनीय खेळ केला होता.

एफसी गोवाने करार वाढविल्याबद्दल नेस्टर, कपिल व लेस्ली यांनी आनंद व्यक्त केला आहे. आपल्यासाठी हे नवे आव्हान असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेणार असल्याचे नेस्टरने नमूद केले. एफसी गोवाने आपल्यावर विश्वास दाखविला असून त्याची परतफेड करण्याचा ग्वाही कपिलने दिली आहे. त्यासाठी परिश्रम घेण्याची आणि आणखीन प्रगती साधण्याचे लक्ष्य कपिलने बाळगले आहे. एफसी गोवा संघाचे आभार मानताना लेस्ली याने भविष्यात मुख्य संघात जागा मिळविण्याचे ध्येय बाळगले आहे.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी नेस्टर, कपिल व लेस्ली यांचे अभिनंदन केले आहे. या खेळाडूंनी मागील दोन मोसमात खूप आश्वासक खेळ केला आहे आणि ते आमच्यासमवेत यापुढेही प्रगती कायम राखतील असा विश्वास रवी यांनी व्यक्त केला. संघाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या