एफसी गोवाचा ग्लेनशी अल्पमुदतीचा करार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

अनुभवी मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज याचा करार संपुष्टात आणल्यानंतर एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील बाकी मोसमासाठी मध्यरक्षक ग्लेन मार्टिन्स याच्याशी अल्पमुदतीचा करार केला आहे.

पणजी : अनुभवी मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज याचा करार संपुष्टात आणल्यानंतर एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील बाकी मोसमासाठी मध्यरक्षक ग्लेन मार्टिन्स याच्याशी अल्पमुदतीचा करार केला आहे.

गोमंतकीय मध्यरक्षक ग्लेन याला एफसी गोवाने कोलकात्यातील एटीके मोहन बागान संघाकडून करारबद्ध केले आहे. तो एफसी गोवाच्या 25 क्रमांकाच्या जर्सीत खेळेल. वेळसाव येथील ग्लेनला लेनी रॉड्रिग्जच्या जागी स्थान मिळाले आहे. यंदा आयएसएल स्पर्धेत पदार्पण करताना एटीके मोहन बागानतर्फे ग्लेन सात सामन्यांत 224 मिनिटे खेळला.

गोव्यातील सेझा फुटबॉल अकादमीतर्फे कारकिर्दीस सुरवात केल्यानंतर 2014 साली ग्लेन स्पोर्टिंग क्लब द गोवा संघात दाखल झाला. 2019-20 मोसमात तो गोव्याच्याच चर्चिल ब्रदर्स संघातून आय-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळला. 2020-21 मोसमाच्या प्रारंभी त्याने एटीके मोहन बागानशी करार केला. अंतोनियो हबास लोपेझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघात त्याला अधिकांश बदली खेळाडूच्या रुपात संधी मिळाली.

बाकी आयएसएल मोसमासाठी संधी दिल्याबद्दल ग्लेन याने एफसी गोवा संघ व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. सुरवातीपासून आपण एफसी गोवा संघाचा चाहता असून या संघातर्फे खेळणे ही स्वप्नपूर्ती असल्याची प्रतिक्रिया ग्लेनने दिली. कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा असून त्याचा पूर्ण लाभ उठवण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे त्याने नमूद केले. एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी ग्लेनचे संघात स्वागत केले आहे. त्याचा खेळ एफसी गोवाच्या शैलीशी मिळताजुळता असून त्याच्या समावेशाने संघाला लाभ होईल, अशी विश्वास रवी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ग्लेन याच्या बदल्यात एटीके मोहन बागानने 33 वर्षीय लेनी रॉड्रिग्ज याला बाकी मोसमासाठी आपल्या संघात घेतले आहे. लेनी 2022 पर्यंत एफसी गोवा संघातर्फे करारबद्ध होता. भारताचा हा आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक 2018 मध्ये एफसी गोवा संघात दाखल झाला होता, 2014 पासून आयएसएल कारकिर्दीत तो 97 सामने खेळला आहे.

संबंधित बातम्या