युवा फुटबॉलपटूंच्या मदतीस फोर्सा गोवाचे ‘ड्रिल्स’
Dribbling

युवा फुटबॉलपटूंच्या मदतीस फोर्सा गोवाचे ‘ड्रिल्स’

पणजी

कोरोना विषाणू महामारी कालावधीत मैदानावर फुटबॉल खेळणे, तसेच सराव ठप्प असताना युवा फुटबॉलपटूंची खेळाशी जवळीक राखण्यासाठी फोर्सा गोवा फौंडेशनच्या प्रशिक्षकांनी आखलेले ड्रिल्स मदतीस आले.

फोर्सा गोवा फौंडेशनचे प्रशिक्षक हेमंत मिस्त्री आणि झोनल रॉड्रिग्ज यांनी युवा प्रशिक्षणार्थींना घरीच शक्य असलेल्या फुटबॉल ड्रिल्सची निर्मिती केली. त्यामुळे मैदानावर न जाता लहान वयाच्या खेळाडूंना फुटबॉल कौशल्य विकसित करण्यासाठी सक्रिय राहता आले.

कोव्हिड-१९ महामारीमुळे मुलं फुटबॉल खेळण्यास मुकली, पण ते फुटबॉलपासून दुरावू नयेत हे ध्यानात घेत आम्ही खास ड्रिल्स विकसित केले, असे प्रशिक्षक हेमंत मिस्त्री यांनी सांगितले. ड्रिल्स केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि प्रत्यक्ष मैदानावर आल्यानंतर ते चांगल्याप्रकारे खेळू शकतील हे उद्दिष्ट आम्ही बाळगले, असे मिस्त्री यांनी नमूद केले.

किपी अप्पी या ड्रिलमध्ये चेंडू जमिनीवर पडू न देता हवेतच पायाने नियंत्रित करावा लागतो, त्यामुळे खेळाडूंना शरीर आणि चेंडू यांचे नियंत्रण राखणे शक्य होते, असे प्रशिक्षक झोनल रॉड्रिग्ज यांनी सांगितले.  वॉल पासमध्ये भिंतीपासून ३ ते ५ फूट दूर राहून पायाच्या मागील बाजूने चेंडूला किक मारल्यानंतर, भिंतीला आपटून परत आलेला चेंडू पायाने नियंत्रित करणे व पुन्हा किक मारणे  समावेश होता. सततपणे हे ड्रिल केल्याने युवा खेळाडूस अचूकतेवर भर देणे शक्य होते, असे मिस्त्री यांनी नमूद केले. कोन ड्रिबलिंगद्वारे युवा खेळाडूंचे ड्रिबलिंग कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला. हे ड्रिल करताना कोन नसेल, तर पाण्याच्या भरलेल्या बाटल्या किंवा वापरलेली पायताणे यांचा वापर अडथळा या नात्याने करून ड्रिबलिंगचा सराव करता येतो, असे रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले.

फुटबॉलविषयक चित्रपट पाहणे, यशापयशास सामोरे गेलेल्या फुटबॉलमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची आत्मचरित्रे वाचणे, फिफा २०२० किंवा पीईएस २०२० या व्हिडिओ गेम्स खेळणे मैदानापासून दूर असलेल्या युवा फुटबॉलपटूंसाठी फायदेशीर असल्याचे मत दोघाही प्रशिक्षकांनी व्यक्त केले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com