एफसी गोवाची यूथ क्लब मनोरा संघावर दोन गोलने सहज मात

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

एफसी गोवा संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत पूर्ण तीन गुणांची कमाई करताना यूथ क्लब मनोरा संघावर 2-0 फरकाने मात केली.

पणजी:  एफसी गोवा संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत पूर्ण तीन गुणांची कमाई करताना यूथ क्लब मनोरा संघावर 2-0 फरकाने मात केली. सामना सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल झाला. जॉयबर्ट आल्मेदा याने 37व्या मिनिटास एफसी गोवाचे गोल खाते उघडले, नंतर 89व्या मिनिटास लालरेमरुआता याने एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.

मनोरा संघाने सेटपिसेसवर एफसी गोवा सतावण्यावर भर दिला, पण त्यांना यश मिळाले नाही. पूर्वार्धात सुरवातीस आयव्हन कॉस्ताच्या क्रॉस पासवर जॉयबर्ट आल्मेदाचे हेडिंग चुकल्यामुळे एफसी गोवास आघाडी मिळाली नाही, मात्र विश्रांतीला सहा मिनिटे बाकी असताना जॉयबर्टने चुकीची भरपाई केली. डेल्टन कुलासो व आयव्हन कॉस्ता यांच्या संयुक्त प्रयत्नावर जॉयबर्टने गोल केला.

ISL2020-21 : एकाच मोसमात आयएसएल करंडक व लीग विनर्स शिल्ड जिंकण्याचा मुंबई...

उत्तरार्धात एफसी गोवास रोखणे मनोरा संघाला जमले नाही. मात्र आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. सामन्याची मोजकीच मिनिटे बाकी असताना एफसी गोवाच्या कपिल होबळे याचा सणसणीत फ्रीकिक फटका मनोरा संघाचा गोलरक्षक लुईस बार्रेटो याने रोखला, मात्र नंतर प्लॅन गोम्सच्या असिस्टवर लालरेमरुआता याने एफशी गोवाची आघाडी वाढविली.

 

संबंधित बातम्या