ईस्ट बंगालने पिछाडीवरून रोखले; बेदियास रेड कार्ड

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

एफसी गोवाने ईस्ट बंगालविरुद्ध बचावफळीत सर्व भारतीय खेळाडूंना स्थान दिले. वीस वर्षीय गोलरक्षक धीरज सिंग एफसी गोवातर्फे पहिला सामना खेळला. बचावपटू आदिल खाननेही आज एफसी गोवा संघात पदार्पण केले.

पणजी: कर्णधार एदू बेदिया याला सामन्यातील 24 मिनिटे बाकी असताना रेड कार्ड मिळल्यानंतर शुक्रवारी एफसी गोवास बरोबरीचा दिलासा मिळाला. सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत ईस्ट बंगालने पिछाडीवरून झुंजार खेळ करत 1-1 गोलबरोबरी नोंदविली. गोव्यातील संघाला सलग तिसऱ्या लढतीत एका गुणावर समाधान मानावे लागले.

सामना शुक्रवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. स्पॅनिश स्ट्रायकर इगोर आंगुलो याने स्पर्धेतील वैयक्तिक दहावा गोल नोंदवत 39व्या मिनिटास एफसी गोवास आघाडी मिळवून दिली. 65व्या मिनिटास इंग्लिश बचावपटू डॅनी फॉक्स याने सेटपिसेसवर ईस्ट बंगालला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात ईस्ट बंगालने एफसी गोवाच्या बचावफळीस खूपच दबाव टाकला, मात्र एका गोलचा अपवाद वगळता गोलरक्षक धीरज सिंग व बचावफळीने कोलकात्याची आक्रमणे रोखून धरली.

सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह एफसी गोवाचा कर्णधार एदू बेदिया याला 66व्या मिनिटास मैदान सोडावे लागल्याने एफसी गोवास दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यापूर्वी सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास अँथनी पिल्किंग्टन याने पेनल्टी फटका  दिशाहीन मारल्यामुळे ईस्ट बंगालची आयती संधी हुकली होती.

एफसी गोवाची ही एकंदरीत सहावी बरोबरी ठरली. त्यांचे आता 14 लढतीनंतर २१ गुण आणि तिसरा क्रमांक कायम राहिला. ईस्ट बंगालची ही सातवी बरोबरी ठरली. त्यामुळे 14 लढतीनंतर त्यांचे 13 गुण झाले असून दहावा क्रमांक कायम आहे. पहिल्या टप्प्यात ईस्ट बंगालने एक खेळाडू कमी झाल्यानंतरही एफसी गोवास बरोबरीत रोखले होते.

तासाभराच्या खेळानंतर ईस्ट बंगालने सेटपिसेसवर बरोबरी साधली. वारंवार आक्रमण रचून एफसी गोवाच्या बचावफळीवर दबाव टाकल्यानंतर कोलकात्याच्या संघाला बरोबरी साधण्यास यश मिळाले. अँथनी पिल्किंग्टन याने मारलेल्या कॉर्नर किकवर गोलरक्षक धीरज चेंडू व्यवस्थित रोखू शकला नाही, त्याचा लाभ उठवत कर्णधार डॅनी फॉक्स याने ईस्ट बंगालला डाव्या पायाच्या फटक्यावर बरोबरी साधून दिली.

विक्रमाच्या उंबरठ्यावर मुंबई सिटी आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक सामने अपराजित राहण्याची संधी -

विश्रांतीला सहा मिनिटे बाकी असताना स्पॅनिश स्ट्रायकर इगोर आंगुलो याने केलेल्या गोलमुळे पूर्वार्धात एफसी गोवा संघ एका गोलने आघाडी होता, तर सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास अँथनी पिल्किंग्टन याने पेनल्टी फटका दिशाहीन मारल्यामुळे ईस्ट बंगालचे अतोनात नुकसान झाले. एफसी गोवाच्या महंमद अली याने नारायण दास याला पाडल्यानंतर रेफरीने ईस्ट बंगालला पेनल्टी फटका बहाल केला होता.

ईस्ट बंगालच्या कमजोर बचावाचा लाभ उठवत आल्बर्टो नोगेरा याने चेंडूवर ताबा मिळविला. त्यानंतर त्याने चेंडू आंगुलोच्या स्वाधीन केला. 36 वर्षीय स्पॅनिश आघाडीपटू वेगाने धाव घेत ईस्ट बंगालच्या बचावपटूंना मागे टाकत नंतर गोलरक्षक देबजित मजुमदार याला सहजपणे चकविले.

ऑल इंडियन डिफेन्स

एफसी गोवाने ईस्ट बंगालविरुद्ध बचावफळीत सर्व भारतीय खेळाडूंना स्थान दिले. वीस वर्षीय गोलरक्षक धीरज सिंग एफसी गोवातर्फे पहिला सामना खेळला. बचावपटू आदिल खाननेही आज एफसी गोवा संघात पदार्पण केले. याशिवाय सेवियर गामा, ऐबान डोहलिंग व महंमद अली या साऱ्या भारतीयांनी एफसी गोवाच्या बचावफळीत जागा मिळविली. रेड कार्डमुळे स्पॅनिश इव्हान गोन्झालेझ, तर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन जेम्स डोनाकी एफसी गोवाच्या बचावफळीत खेळू शकले नाहीत.

दृष्टिक्षेपात...

  • - इगोर आंगुलोचे 13 आयएसएल लढतीत 10 गोल
  • - डॅनी फॉक्सचा 11 आयएसएल सामन्यात 1 गोल
  • - पहिल्या टप्प्यातही एफसी गोवा व ईस्ट बंगाल यांच्यात 1-1 गोलबरोबरी
  • - सलग 3 लढतीत एफसी गोवाची 1-1 गोलबरोबरी, यापूर्वी एटीके मोहन बागान व केरळा ब्लास्टर्सविरुद्ध.
  • - एफसी गोवाचे स्पर्धेत 19 गोल, मुंबई सिटीशी बरोबरी
  • - एफसी गोवा 7 लढती अपराजित, 3 विजय, 4 बरोबरी

 

संबंधित बातम्या