गोल नव्वद मिनिटांतच हवेत : फेरांडो

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

एफसी गोवा संघाला सामन्यावर नियंत्रण राखत नव्वद मिनिटांतच गोल नोंदवावे लागतील, शेवटच्या मिनिटापर्यंत थांबता येणार नाही,

पणजी : एफसी गोवा संघाला सामन्यावर नियंत्रण राखत नव्वद मिनिटांतच गोल नोंदवावे लागतील, शेवटच्या मिनिटापर्यंत थांबता येणार नाही, असे सांगत मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी नव्या दमाच्या ईस्ट बंगालविरुद्धच्या लढतीपूर्वी रणनीती स्पष्ट केली.

वास्को येथील टिळक मैदानावर बुधवारी (ता. 6) एफसी गोवासमोर ईस्ट बंगालचे आव्हान असेल. एफसी गोवाने मागील दोन लढती जिंकल्या आहेत, पण दोन्ही वेळेस इगोर आंगुलो याच्या इंज्युरी टाईम गोलची मदत झाली. ही बाब फेरांडो यांनी गांभीर्याने घेतली असून बुधवारच्या लढतीत पूर्ण तीन गुण नव्वद मिनिटांच्या खेळातच मिळविण्याचा त्यांचा भर आहे. ``ईस्ट बंगाल संघात नवे खेळाडू आहेत. त्यांच्या खेळाडूंना जागा उपलब्ध झाल्यास ते धोकादायक ठरतील. त्यामुळे सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखणे आमच्यासाठी फार महत्त्वाचे असेल. उद्याचा सामना पूर्णतः वेगळा असेल,`` असे फेरांडो यांनी सांगितले. नऊपैकी चार सामने जिंकलेल्या एफसी गोवाचे प्लेऑफ फेरीचे लक्ष्य आहे.

रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगाल संघ मागील तीन लढतीत अपराजित आहेत. केरळा ब्लास्टर्स व चेन्नईयीनविरुद्ध वर्चस्व राखूनही त्यांना बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. मात्र मागील लढतीत ओडिशा एफसीला नमवून त्यांनी आयएसएलमधील पहिल्या विजयाची नोंद केली. जॅक मघोमा, अँथनी पिलकिंग्टन यांच्यासह नवा खेळाडू ब्राईट एनोबाखारे या आक्रमक खेळाडूंचा एफसी गोवासमोर धोका असेल. ईस्ट बंगालचा बचाव भरवशाचा नाही. त्यांनी 14 गोल स्वीकारले आहेत. ही बाब एफसी गोवाच्या पथ्यावर पडू शकते. त्याचवेळी स्पर्धेत आतापर्यंत एकच क्लीन शीट राखलेल्या एफसा गोवासही आपला बचाव मजबूत राखावा लागेल.

युवा खेळाडूंना प्रोत्साहन व बढती

संघातील नवोदित युवा खेळाडूंना प्रोत्साहन व बढती देणे हे एफसी गोवाचे धोरण आहे. त्यावरच सध्या मेहनत घेतली जात आहे. एफसी गोवातील परदेशी खेळाडू केवळ खेळण्यासाठी येथे आलेले नाही, तर संघातील युवा खेळाडूंसाठी मार्गदर्शनकाची जबाबदारीही ते पेलत असल्याचे ज्युआन फेरांडो यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा:

सर्वाधिक गोलांच्या स्पर्धेत या श्रेष्ठ खेळाडूला मागे टाकत रोनाल्डोने दुसऱ्या क्रमांकावर -

 

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाचे स्पर्धेत 12, ईस्ट बंगालचे 8 गोल

- ईस्ट बंगालवर प्रतिस्पर्ध्यांचे 14 गोल, तर एफसी गोवावर 10 गोल

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे सर्वाधिक 9 गोल

- एफसी गोवाचे स्पर्धेत 4625 पासेस, त्यापैकी कर्णधार एदू बेदियाचे 655

- ईस्ट बंगालच्या जॅक मघोमाचे 3 गोल

- एफसी गोवाचे 14, तर ईस्ट बंगालचे 6 गुण

 
 

संबंधित बातम्या