एफसी गोवा सरावासाठी नव्या मैदानावर?

एफसी गोवा सरावासाठी नव्या मैदानावर?
fc Goa

पणजी

कोरोना विषाणू महामारी उद्रेक नियंत्रणात आल्यानंतर एफसी गोवा संघ आगामी मोसमापूर्वी नव्या मैदानावर सराव करण्याचे संकेत आहेत. सामंजस्य करारांतर्गत साल्वादोर-द-मुंद पंचायत मैदानावर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील माजी उपविजेते सराव करू शकतात.

साल्वादोर-द-मुंद मैदानाचा सरावासाठी मुख्य संघ वापर करेल याबाबत एफसी गोवा संघाकडून अजून पुष्टी मिळालेली नाही, मात्र सांमजस्य करारामुळे शक्यता बळावल्याची चर्चा आहे. कदाचित हे मैदान एफसी गोवाच्या ज्युनियर संघाच्या सरावासाठीही वापरले जाऊ शकते. या वर्षीच्या सुरवातीस एफसी गोवा व्यवस्थापनाने साल्वादोर-द-मुंद पंचायतीबरोबर क्लबच्या युवा विकास प्रकल्पांतर्गत करार केला होता. पंचायतीचे मैदान व्यावसायिक मानक दर्जाचे आहे, तसेच याठिकाणी सर्वसुविधायुक्त व्यायामशाळाही आहे.

गतमोसमात (२०१९-२०) सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने आयएसएल स्पर्धेपूर्वी बांबोळी येथील एथलेटिक्स स्टेडियमवर सराव केला होता. हेच मैदान त्यांचे संपूर्ण मोसम मुख्यालय ठरले होते. त्यापूर्वी दोन मोसम एफसी गोवाने लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेनमध्ये मोसमपूर्व सराव केला होता, तर झिको प्रशिक्षक असताना तीन मोसम आखातात, तसेच ब्राझीलमध्ये एफसी गोवा संघ मोसमपूर्व सरावासाठी गेला होता.

 नव्या मोसमासाठी तयारी

नव्या मोसमासाठी एफसी गोवा संघाने स्पेनचे ३९ वर्षीय ज्युआन फरांडो यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघ एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविणारा पहिला भारतीय संघ हा मान त्यांना गतमोसमात आयएसएल लीग विनर्स शिल्ड जिंकल्यामुळे मिळाला आहे. सध्या क्लबने नवे खेळाडू करारबद्ध करण्यावर भर दिला आहे. शिलाँग-मेघालयाचा विंगर रेडील ट्लांग याला त्यांनी नुकतेच करारबद्ध केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com