एफसी गोवासमोर चेन्नईयीनचे खडतर आव्हान

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचे व्यस्त वेळापत्रक आणि खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्न जटील बनल्यामुळे एफसी गोवा संघ त्रस्त आहे.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचे व्यस्त वेळापत्रक आणि खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्न जटील बनल्यामुळे एफसी गोवा संघ त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा शनिवारी (ता. 19) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांच्यासमोर गतउपविजेत्या चेन्नईयीन एफसीचे खडतर आव्हान असेल.

खेळाडू मशिन नाहीत, ते मानव आहेत. त्यांनाही ताण जाणवतो. विश्रांतीसाठी त्यांना पुरेसा वेळ आवश्यक आहे, असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी बुधवारी एटीके मोहन बागानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर सांगितले होते. व्यस्त वेळापत्रकामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे फेरांडो यांचे म्हणणे आहे. पूर्ण तंदुरुस्तीअभावी एटीके मोहन बागानविरुद्ध संघातील प्रमुख खेळाडू ब्रँडन फर्नांडिस व जॉर्जे ओर्तिझ सुरवातीपासून खेळू शकले नव्हते. अशीच परिस्थिती ओडिशाविरुद्ध एदू बेदियाच्या बाबतीत होती.

मागील लढतीत एफसी गोवास एटीके मोहन बागानकडून रॉय कृष्णाच्या 85व्या मिनिटातील पेनल्टी गोलमुळे पराभूत व्हावे लागले. त्यांचा तो स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. अन्य दोन विजय व तेवढ्याच बरोबरीमुळे एफसी गोवाच्या खाती सहा लढतीतून आठ गुण आहेत. त्यापूर्वी पेनल्टी गोल स्वीकारल्यामुळे एफसी गोवा संघाला मुंबई सिटीविरुद्धही हार पत्करावी लागली होती. पेनल्टी गोलमुळे संघ पराभूत होण्याची सल फेरांडो यांना आहे. ही बाब योग्य नव्हे असे त्यांनी नमूद केले.

हंगेरीचे साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीची कामगिरीही उठादार नाही. पाच लढतीत एक विजय, दोन बरोबरी आणि दोन पराभव अशा कामगिरीमुळे त्यांच्या खाती फक्त पाच गुण आहेत. त्यांनाही खेळाडूंच्या दुखापती सतावत आहेत. संघ गोल नोंदवत नसल्याबद्दल ते नाराज आहेत. एफसी गोवास रोखण्यासाठी संघटित खेळाची गरज लाझ्लो यांनी प्रतिपादली.

आणखी वाचा:

आयएसएलमध्ये विक्रम करत सुनील छेत्रीने ओडिशाला नमवले -

 

दृष्टिक्षेपात...

  • - आयएसएलमधील 17 सामन्यांत एफसी गोवाचे 9, चेन्नईयीनचे 7 विजय, 1 बरोबरी
  • - दोन्ही संघांचे एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 33 गोल
  • - चेन्नईयीनविरुद्ध मागील 4 लढतीत एफसी गोवाचे 3 विजय
  • - गतमोसमात उभय संघातील 4 लढतीत 21 गोल, एफसी गोवाचे 12, चेन्नईयीनचे 9 गोल
  • - यंदाच्या आयएसएलमध्ये एफसी गोवाचे 7, तर चेन्नईयीनचे 3 गोल
  • - एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे यंदा 6 गोल

संबंधित बातम्या