ISL 2020-21 : दोन गोलच्या पिछाडीवरून एफसी गोवाने मुंबई सिटीस रोखले

दैनिक गोमन्तक
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

सुबर सब ईशान पंडिता याने मैदानात उतरल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच निर्णायक हेडिंग साधत एफसी गोवास सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रोमहर्षक बरोबरी साधून दिली.

पणजी : सुबर सब ईशान पंडिता याने मैदानात उतरल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच निर्णायक हेडिंग साधत एफसी गोवास सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रोमहर्षक बरोबरी साधून दिली. त्याने इंज्युरी टाईममधील शेवटच्या मिनिटास अचूक लक्ष्य साधले. दोन गोलच्या पिछाडीवरून गोव्यातील संघाने मुंबई सिटीस 3 - 3 असे रोखले.

IndvsEng Day 4th: अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडचा संघ 178 धावांवर आटोपला;...

अटीतटीचा ठरलेला सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. पूर्वार्धातील सहा मिनिटांत दोन गोल नोंदवून मुंबई सिटीने भक्कम आघाडी प्राप्त केली. फ्रेंच मध्यरक्षक ह्युगो बुमूसने 20 व्या, तर ब्रिटिश फुटबॉलपटू एडम ली फाँड्रे याने 26 व्या मिनिटास मुंबई सिटीसाठी गोल केला. दोन गोलांनी मागे पडल्यानंतर एफसी गोवाने जबरदस्त उसळी घेतली. 45 व्या मिनिटास गोमंतकीय मध्यरक्षक ग्लेन मार्टिन्सने एफसी गोवाची पिछाडी कमी करताना आयएसएलमधील वैयक्तिक पहिला गोल केला. त्यानंतर 51वा मिनिटास स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याने एफसी गोवास 2 - 2 गोलबरोबरी साधून दिली. त्याचा स्पर्धेतील अकरावा गोल ठरला. 90व्या मिनिटास गोमंतकीय मध्यरक्षक रॉवलिन बोर्जिस याने सेटपिसेसवर साधलेल्या सुरेख हेडिंगमुळे मुंबई सिटीने 3-2 अशी महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली. सेवियर गामा याच्या जागी इंज्युरी टाईममध्येच मैदानात उतरलेल्या ईशानने 90+5 व्या मिनिटास निर्णायक गोल केला.

एफसी गोवाची ही सलग पाचवी बरोबरी, तर एकंदरीत आठवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 16 लढतीतून 23 गुण झाले आहेत. हैदराबाद (+4) व नॉर्थईस्ट युनायटेडचेही (+1) तेवढेच गुण आहेत, पण +5 गोलसरासरीमुळे एफसी गोवाने तिसरा क्रमांक मिळविला. मुंबई सिटीची ही चौथी बरोबरी ठरली. त्यांचे आता 16 सामन्यांतून 34 गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानवर चार गुणांची आघाडी मिळविली आहे.

 

मुंबई सिटीस आघाडी

पूर्वार्धातील खेळात मुंबई सिटीने 2-1 आघाडी मिळविली होती. आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाविरुद्ध गोल नोंदवत ह्यूगो बुमूस याने मुंबई सिटीचे खाते उघडले. एडम ली फाँड्रेच्या असिस्टवर हा गोल झाला. यावेळी एफसी गोवास कर्णधार एदू बेदिया याची चेंडूवर ताबा न राखण्याची चूक महागात पडली. त्यानंतर सहा मिनिटांनी एडम ली फाँड्रे याच्या गोलमुळे मुंबई सिटीला दोन गोलांनी भक्कम आघाडी मिळाली. हर्नान सांतानाच्या हेडिंगवर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगने रोखला, पण रिबाऊंडवर फाँड्रे याचे हेंडिग थोपविणे धीरजला शक्य झाले नाही.

एफसी गोवाची मुसंडी

स्पॅनिश मध्यरक्षक होर्जे ओर्तिझच्या असिस्टवर ग्लेन मार्टिन्सने आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक पहिला गोल नोंदवन एफसी गोवाची पिछाडी एका गोलने कमी केली. ओर्तिझकडून मैदानाच्या डाव्या बाजूतून मिळालेल्या चेंडूवर मार्टिन्सने सणसणीत फटका मारला, त्यावेळी मुंबई सिटीचा अनुभवी गोलरक्षक अमरिंदर सिंग याला चेंडूचा अंदाज अजिबात आला नाही. त्यापूर्वी एफसी गोवाच्या इगोर आंगुलो याचा भेदक हेडर अमरिंदरने चपळाईने अडविला होता. विश्रांतीनंतरच्या सहाव्या मिनिटास आंगुलोने आल्बर्टो नोगेराच्या असिस्टवर मुंबई सिटीच्या पेनल्टी क्षेत्रातून ऑफसाईड व्यूहरचना भेदत आंगुलोने अचूक हेडिंगवर एफसी गोवास बरोबरी साधून दिली.

दृष्टिक्षेपात...

- ह्यूगो बुमूसचे यंदा 13 सामन्यात 2 गोल, एकंदरीत 54 आयएसएल लढतीत 18 गोल

- एडम ली फाँड्रे याचे मोसमातील 15 सामन्यात 9 गोल

- ग्लेन मार्टिन्सचा 9 आयएसएल लढतीत 1 गोल, एफसी गोवातर्फे 26 वर्षीय मध्यरक्षकाचा दुसराच सामना

- 36 वर्षीय स्ट्रायकर इगोर आंगुलोचे 15 सामन्यात 11 गोल, मोसमात सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीत एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाला गाठले

- रॉवलिन बोर्जिसचे 78 आयएसएल सामन्यात 8 गोल, यंदा 15 लढतीत 2 गोल

- ईशान पंडिताचे 6 सामन्यात 3 गोल, सर्व वेळेस सुपर सब

- एफसी गोवाच्या आल्बर्टो नोगेरा याचे 15 सामन्यात 7 असिस्ट

- एकमेकांविरुद्धच्या 16 आयएसएल लढतीत एफसी गोवा व मुंबई सिटीत 4 बरोबरी

- स्पर्धेत मुंबई सिटीचे सर्वाधिक 25, तर एफसी गोवाचे 24 गोल

संबंधित बातम्या