माफीनाम्यामुळे एफसी गोवाचा मध्यरक्षक आल्बर्टो नोगेराचं निलंबन मागे; आज केरळा ब्लास्टर्सविरुद्ध खेळणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 डिसेंबर 2020

माफीनाम्यामुळे एफसी गोवाचा मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा निलंबनाच्या शिक्षेतून बचावला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या सामन्यासाठी स्पॅनिश खेळाडू उपलब्ध असेल.

पणजी :  माफीनाम्यामुळे एफसी गोवाचा मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा निलंबनाच्या शिक्षेतून बचावला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या सामन्यासाठी स्पॅनिश खेळाडू उपलब्ध असेल.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात 30 नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात घडलेल्या अप्रिय घटनेबद्दल नोगेरा याच्यावर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीने कारवाई केली होती व त्याच्यावर एका सामन्याचे निलंबन लादले होते.

नोगेरा याला नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रशिक्षक जेरार्ड नूस यांच्यात वाद झाला होता. यावेळी नोगेरा याने नूस यांना ढकलल्याचे जाणवत आले होते. खेळाडूचे हे कृत्य अशोभनीय आणि अखिलाडूवृत्तीचे असल्याचे निष्कर्ष शिस्तपालन समितीने काढला व त्याच्या नियमानुसार एका सामन्याची बंदी लादण्याचा निर्णय दिला. त्यानंतर एफसी गोवाने शिस्तपालन समितीला सदर घटनेचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली. नव्याने सदर घटनेचे चित्रिकरण समाधान झाल्यानंतर आणि खेळाडूने नॉर्थईस्ट संघाच्या मुख्य प्रशिक्षकांना सादर केलेल्या माफीपत्रानंतर शिस्तपालन समितीने कारवाई शिथिल केली. नॉर्थईस्टच्या प्रशिक्षकांपना कोणतीही शारीरिक इजा करण्याचा किंवा त्यांच्याप्रती कोणत्याच प्रकारे अनादर व्यक्त करण्याचा हेतू नव्हता, असे नोगेरा याने माफीपत्रात नमूद केले. भावनातिरेकात कृत्य घडल्याबद्दल त्याने खेद व्यक्त केला.

 
 

संबंधित बातम्या