एफसी गोवाची जर्मन क्लबशी भागीदारी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

युवा विकास आणि मार्गदर्शक प्रशिक्षणावर भर देत एफसी गोवा व्यवस्थापनाने जर्मन बुंडेस्लिगा संघ आरबी लेपझिगसोबत तीन वर्षांसाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्याअंतर्गत देशव्यापी फुटबॉल शिबिरांवरही भर दिला जाईल. 

पणजी  : युवा विकास आणि मार्गदर्शक प्रशिक्षणावर भर देत एफसी गोवा व्यवस्थापनाने जर्मन बुंडेस्लिगा संघ आरबी लेपझिगसोबत तीन वर्षांसाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्याअंतर्गत देशव्यापी फुटबॉल शिबिरांवरही भर दिला जाईल. 

बुंडेस्लिगा स्पर्धेत लेपझिग हा नावाजलेला संघ आहे. २००९ साली स्थापन झाल्यानंतर या क्लबने मोठी मजल गाठली. २०१६ मध्ये हा क्लब बुंडेस्लिगासाठी पात्र ठरला. २०१७-१८ मोसमात यूईएफए चँपियन्स लीगसाठी पात्रता मिळविली, तर युरोपातील या प्रमुख स्पर्धेची २०१९-२० मोसमात उपांत्य फेरी गाठली.

एफसी गोवा आणि आरबी लेपझिग यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या कालावधीत लेपझिग अकादमीतील प्रशिक्षकांना गोव्यात निमंत्रित करण्यात येईल. याशिवाय एफसी गोवाच्या युवा कार्यक्रमातील प्रशिक्षक आणि खेळाडू लेपझिग यूथ अकादमीत अद्ययावत प्रशिक्षणासाठी जातील. भागीदारीच्या माध्यमातून आरबी लेपझिग व्यावसायिकदृष्ट्या भारतात संधीही शोधणार आहे.

एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांनी आरबी लेपझिगबरोबरची भागीदारी प्रत्यक्षात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एफसी गोवाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय भागीदारी असून योग्य सहकारी लाभल्याबद्दल टंडन यांनी समाधान व्यक्त केले. या भागीदारीतून जागतिक पातळीवर भारतीय फुटबॉलपटूंचा विकास साधण्याचे ध्येय राहील असेही त्यांनी नमूद केले. आरबी लेपझिगचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ऑलिव्हर मिंत्झलाफ यांनी सांगितले, की एफसी गोवासोबतची चर्चा पारदर्शक आणि विश्वासदर्शक ठरली. प्रगतशील भारतीय बाजारपेठेत आमच्या भविष्यकालीन उपक्रमांसाठी चांगली सुरवात झाली आहे.

संबंधित बातम्या