आयएसएलमध्ये पूर्ण गुण मिळवण्यासाठी एफसी गोवाचा आज नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध लागणार कस

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

एफसी गोवा संघ यंदा सातव्या मोसमात पूर्ण तीन गुणांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. दोन लढतीतून फक्त एका गुणाची कमाई केलेल्या या संघासमोर आज गुवाहाटीच्या धोकादायक नॉर्थईस्ट युनायटेडचे खडतर आव्हान असेल.

पणजी  :  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत गतमोसमात बारा सामने जिंकलेल्या एफसी गोवा संघ यंदा सातव्या मोसमात पूर्ण तीन गुणांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. दोन लढतीतून फक्त एका गुणाची कमाई केलेल्या या संघासमोर आज गुवाहाटीच्या धोकादायक नॉर्थईस्ट युनायटेडचे खडतर आव्हान असेल.

 

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत आपल्या संघाची पूर्ण तीन गुण मिळविण्याचीच मानसिकता असल्याचे एफसी गोवाचे प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो सोमवारी स्पष्ट केले. दुसरीकडे ३५ वर्षीय जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेड संघ उल्लेखनीय कामगिरी कायम राखण्यास इच्छुक असेल. सर्वाधिक काळ सामन्यावर नियंत्रण राखत संधी निर्माण करणारा संघ जिंकेल. त्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना संधी साधण्यापासून रोखावे लागेल, असे नूस यांनी सांगितले.

 

धोकादायक प्रतिस्पर्धी

अगोदरच्या दोन सामन्यातील निकालाने आपण निराश असल्याचे ३९ वर्षीय फेरॅन्डो यांनी नमूद केले. बंगळूरविरुद्ध जास्त संधी होत्या, तर मुंबईविरुद्ध आमच्या खेळाडूंना पुरेशी संधी मिळाली नाही, असे फेरॅन्डो यांनी सांगितले. नॉर्थईस्ट युनायटेड धोकादायक प्रतिस्पर्धी असल्याचे फेरॅन्डो यांना मान्य आहे. हा संघ आक्रमक खेळतो, त्यांच्यापाशी चांगले ड्रिबलिंग कौशल्य असलेले ताकदवान विंगर्स असून त्यांच्याविरुद्ध खेळणे सोपे नाही, असे फेरॅन्डो म्हणाले.  

 

``नियंत्रण राखणे महत्त्वाचे आहे. आमचे नियोजन तयार आहे, ते असणे आवश्यकच आहे, पण उघड करणार नाही.``

- ज्युआन फेरॅन्डो, प्रशिक्षक एफसी गोवा

 

``मागील दोन सामन्यांतील कामगिरीने संघाचे मनोधैर्य उंचावले असून खेळाडू उत्साहित आहेत. वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर प्रगती साधण्यासाठी खूप गोष्टी आहेत.

- जेरार्ड नूस, प्रशिक्षक नॉर्थईस्ट युनायटेड

 

दृष्टिक्षेपात...

- प्रत्येकी 2 लढतीनंतर नॉर्थईस्ट युनायटेडचे 4, तर एफसी गोवाचा फक्त 1 गुण

- दोन्ही संघांचे आतापर्यंत 3 गोल, तेवढेच गोल स्वीकारलेत

- एफसी गोवाची बंगळूर एफसीविरुद्ध 2-2 बरोबरी, मुंबई सिटीविरुद्ध 0-1 पराभव

- नॉर्थईस्ट युनायटेडचा मुंबई सिटीवर 1-0 विजय, केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 2-2 बरोबरी

- गतमोसमात (2019-20) गुवाहाटी येथे 2-2 बरोबरी, फातोर्डा येथे एफसी गोवाचा 2-0 विजय

- उभय संघांतील मागील 5 लढतीत एफसी गोवाचे 3 विजय, 2 बरोबरी

 

अधिक वाचा :

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यादरम्यान  षटकांची गती न राखल्यामुळे भारतीय संघाला दंड 

एफसी गोवाच्या रेडीमला कारणे दाखवा नोटीस 

 

 

 

संबंधित बातम्या