एफसी गोवाचा प्रस्ताव आकर्षक गोन्झालेझ

किशोर पेटकर
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

आयएलएस लीग विनर्स शिल्ड विजेत्यांचा मोसमातील पाचवा नवा खेळाडू

पणजी

एफसी गोवाचा प्रस्ताव खरोखरच आकर्षक आहे, तसेच मोठी संधी असल्याने आपणास येथे येण्यास आनंद वाटत आहे, अशी प्रतिक्रिया या संघाचा नवा स्पॅनिश बचावपटू इव्हान गोन्झालेझ याने दिली. आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेत्या संघाचा तो २०२०-२१ मोसमासाठीचा पाचवा नवा खेळाडू ठरला.

एफसी गोवा संघाच्या दोन वर्षांच्या करारपत्रावर सही केल्यानंतर गोन्झालेझ याने स्पेनमधून व्हिडिओ संदेशाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. ‘‘अवघ्या काही वर्षांतच या क्लबने भारतात मोठे नाव कमावले आहे आणि मला कारकिर्दीतील प्रगती साधण्याची छान संधी आहे,’’ असे हा ३० वर्षीय सेंटर-बॅक बचावपटू म्हणाला.

एफसी गोवाने नव्या मोसमात करारबद्ध केलेल्या स्पॅनिश खेळाडूंतील गोन्झालेझ तिसरा नवा खेळाडू आहे. क्लबने यापूर्वीच आघाडीपटू इगोर आंगुलो व विंगर जॉर्ज ऑर्टिझ यांना करारबद्ध केले आहे. रेडीम ट्लांग व माकन विंकल चोथे हे भारतीय खेळाडूही प्रथमच एफसी गोवा संघाकडून खेळतील.

केवळ बचावपटूच नाही...

आपण संघात केवळ बचावपटूच नसेन, तर चेंडू खेळवत बचावफळीतून खेळास पुढे नेणे आवडते. त्यात आपण चांगले कौशल्य प्राप्त केले आहे, असे गोन्झालेझ याने नमूद केले. एफसी गोवाचे नवे स्पॅनिश प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यापूर्वी खेळलो असल्याची माहिती गोन्झालेझने दिली. आपला आणि प्रशिक्षकांचा दृष्टिकोन जुळत असून त्याचा फायदा होईल, असे गतमोसमात स्पेनमधील खालच्या श्रेणीतील कल्चरल लिओनेसा संघाचे नेतृत्व केलेल्या गोन्झालेझने नमूद केले.

इव्हान गोन्झालेझ याच्याविषयी...

- एडी पार्ला संघातून युवा कारकिर्दीस प्रारंभ

- वयाच्या बाराव्या वर्षी स्पेनमधील बलाढ्य रेयाल माद्रिदच्या युवा संघात दाखल

- रेयाल माद्रिदच्या क संघात स्थान मिळविण्यापूर्वी १९ वर्षांखालील संघात

- दोन टप्प्यात कल्चरल लिओनेसा संघातर्फे ५ मोसमात १५० हून जास्त सामने

- स्पेनमधील रेसिंग फेर्रोल, यूबी काँकेन्स, देर्पोर्तिव्हो ब संघाचेही प्रतिनिधित्व

‘‘गतमोसमात आम्ही (एफसी गोवा) गुणतक्त्यात अव्वल क्रमांक मिळविला होता. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे आम्हाला आवडेल. चँपियन्स लीगमधील मोहीम सुद्धा हाती आहे. आगामी प्रत्येक आव्हानासाठी उत्सुक आहे. सध्याच्या क्षणी फक्त सुरवात होण्याची प्रतीक्षा आहे.’’

- इव्हान गोन्झालेझ, एफसी गोवाचा बचावपटू
 

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या