आंगुलोच्या धडाक्यामुळे एफसी गोवाने बंगळूरला बरोबरीत रोखले

FC Goa stopped Bangalore and tied the ISL match match with 2-2 goals each
FC Goa stopped Bangalore and tied the ISL match match with 2-2 goals each

पणजी :  स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलोच्या दोन शानदार गोलमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाने पिछाडीवरून माजी विजेत्या बंगळूरला २-२ असे गोल बरोबरीत रोखले. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेला सामना उत्तरार्धात रंगतदार ठरला.

कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूर संघाने एफसी गोवाविरुद्ध आठ आयएसएल लढतीतील दुसरी बरोबरी नोंदविली. गतमोसमातही फातोर्डा येथे उभय संघांतील सामना १-१ असा बरोबरी राहिला होता. एफसी गोवाचे प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो याने आज बरोबरीसह आयएसएलमध्ये पदार्पण केले. बंगळूरचा हुकमी खेळाडू सुनील छेत्रीला विशेष सूर गवसला नाही. ८५व्या मिनिटास प्रशिक्षकांनी त्याला विश्रांती देत लिऑन ऑगस्टिन याला मैदानात धाडले. दोन्ही संघांनी बरोबरीमुळे प्रत्येकी एका गुणाची कमाई केली.

पूर्वार्धातील २७व्या मिनिटास ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने पहिला गोल केल्यानंतर ५७व्या मिनिटास स्पॅनिश बचावपटू ज्युआनन याने आघाडी वाढविली. यासह बंगळूरने आयएसएल स्पर्धेतील गोलशतक नोंदविले. एफसी गोवाचा स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याने तीन मिनिटात दोन गोल नोंदवून सामन्यातील रंगत वाढविली. या ३६ वर्षीय अनुभवी खेळाडूने ६६व्या मिनिटास संघाची पिछाडी कमी केल्यानंतर, ६९व्या मिनिटास गतमोसमातील लीग विनर्स शिल्ड विजेत्या संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली.

बंगळूरची आघाडी

बंगळूर एफसीने आघाडी घेतली तेव्हा सामना सुरू होऊन २७ मिनिटे झाली होती. बंगळूरच्या हरमज्योतसिंग खब्रा याच्या ताकदवान थ्रोईनवर एफसी गोवाच्या जॉर्ज ऑर्टिझ याने चेंडू हेडिंगद्वारे दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. या संधीचा लाभ उठवत क्लेटन सिल्वा याने भेदक हेडर साधत बंगळूरच्या संघाला आघाडी मिळवून दिली. ब्राझीलियन मध्यरक्षकाचा हा आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला.

उत्तरार्धातील खेळातील बाराव्या मिनिटास बंगळूरची आघाडी वाढली. एफसी गोवाच्या गोलरक्षेत्रात एरिक पार्तालू याने दिलेल्या भेदक पासवर ज्युआनन याने अगदी जवळून गोलरक्षक महंमद नवाझ याला चकवून चेंडूला नेटच्या डाव्या कोपऱ्यात जागा मिळवून दिली. यावेळी ज्युआनन ऑफसाईड ठरला नाही.

विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना बंगळूरला आणखी एक गोल करण्याची संधी होती, पण ती विफल ठरली. आशिक कुरुनियान याने रचलेल्या पासवर क्लेटन सिल्वा याने चेंडूवर ताबा मिळवत आणि नंतर सुनील छेत्रीला बॅकपास दिला. यावेळी बंगळूरचा कर्णधार चेंडूवर पूर्ण ताबा राखू शकला नाही, त्यामुळे एफसी गोवाच्या बचावपटूस संघावरील संकट टाळता आले. एफसी गोवास पूर्वार्धातील ४५व्या मिनिटास संधी होती, मात्र इगोर आंगुलो याचा फटका बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू कठीण ठरला नाही.

आंगुलोचा धडाका...
मागील तीन मोसम आयएसएल स्पर्धेत खेळताना ४८ गोल केलेला स्पॅनिश आघाडीपटू फेरान कोरोमानिस यंदा एफसी गोवा संघात नाही, त्याची जागा घेतलेल्या ३६ वर्षीय इगोर आंगुलोने रविवारी निवड सार्थ ठरविली. एटलेटिको बिल्बाओ संघाच्या या माजी खेळाडूने २०१६ ते २०२० या कालावधीत पोलंडमधील व्यावसायिक फुटबॉल गाजविले. गॉर्निक झाब्रझे संघातर्फे त्याने चार मोसमात सर्व स्पर्धांत मिळून ८८ गोल नोंदविले. त्यापैकी ६४ गोल अव्वल श्रेणी स्पर्धेत केले होते. रविवारी सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना ऑफसाईड ठरला नसता, तर आंगुलोच्या नावावर यंदाच्या आयएसएलमधील पहिली हॅटट्रिक लागली असती. उत्तरार्धात एफसी गोवाचे प्रशिक्षक फेरॅन्डो यांनी संघात तीन बदल करताना अनुक्रमे ब्रँडन फर्नांडिस, आल्बर्टो नोगेरा व ॲलेक्झांडर रोमारियो यांना मैदानात उतरविले. त्याचा निर्णायक परिणाम एफसी गोवाच्या खेळात झाला आणि गोलही नोंदविता आले. ब्रँडन व नोगेरा यांच्या संयुक्त प्रयत्नाअंती आंगुलोने एफसी गोवाची पिछाडी एका गोलने कमी केली. तीन मिनिटानंतर ब्रँडनने रोमारियोसह उजव्या बाजूने चेंडू पास केला. त्यानंतर आंगुलोने फिनिशिंगचे काम सुरेखपणे बजावले.

दृष्टिक्षेपात...

  •   बंगळूर एफसीविरुद्ध एफसी गोवाचा बचावपटू सेरिटन फर्नांडिस याचा   सलग आठवा सामना
  •   बंगळूर एफसीचे आयएसएल स्पर्धेत १०० गोल
  •   बंगळूरच्या क्लेटन सिल्वाचा आयएसएलमधील वैयक्तिक पहिला  गोल
  •   ज्युआननचे आता आयएसएल स्पर्धेत वैयक्तिक ४        गोल
  •   पोलंडमध्ये यशस्वी ठरलेल्या इगोर आंगुलोने २ गोलांसह  आयएसएलमध्ये खाते उघडले
  •   एफसी गोवा आणि बंगळूर यांच्यात आतापर्यंत ८ सामने, बंगळूरचे ५  विजय, एफसी गोवाचा १ विजय, २ बरोबरी
  • एफसी गोवाविरुद्ध बंगळूर सलग सातव्या लढतीत अपराजित

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com