आयएसएलमध्ये फॉर्म परत मिळवण्यासाठी एफसी गोवाचा संघर्ष

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

एफसी गोवा संघ नवे प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली सफाईदार फुटबॉल खेळत आहे, पण त्याचे गुणांत परिवर्तन होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर संघाचा अनुभवी बचावपटू इव्हान गोन्झालेझ आशावादी आहे.

पणजी : एफसी गोवा संघ नवे प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली सफाईदार फुटबॉल खेळत आहे, पण त्याचे गुणांत परिवर्तन होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर संघाचा अनुभवी बचावपटू इव्हान गोन्झालेझ आशावादी आहे. सुरवातीच्या धक्याघातून संघ नक्कीच सावरेल असे या स्पॅनिश खेळाडूस वाटते.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील पहिल्या लढतीत दोन गोलांच्या पिछाडीवरून एफसी गोवाने बंगळूरला २-२ असे गोलबरोबरीत रोखले, तर मागील लढतीत दहा खेळाडूंसह खेळताना बंगळूर एफसीकडून ०-१ फरकाने पराभव पत्करावा लागला. दोन लढतीतून एफसी गोवाच्या खाती फक्त एक गुण आहे. त्यांचा पुढील सामना सोमवारी  फातोर्डा येथे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल.
‘‘आतापर्यंतच्या दोन सामन्यातून एक बाब सिद्ध झालीय, ती म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आणि मानसिक कणखरतेत आमचा संघ खूपच चांगला आहे. चांगले संघ खराब परिस्थितीत मजबूत बनतात, असे गोन्झालेझ म्हणाला. पराभूत होणे योग्य नाही. तथापि, यामुळे आम्ही आणखी जवळ येऊ असे मला वाटते. त्याद्वारे एक संघ या नात्याने आम्ही किती भक्कम आहोत हे दाखविण्याची संधी लाभेल आणि कोणत्याही परिस्थितीत पुनरागमन करण्याची क्षमता सिद्ध होईल,’’ असे गोन्झालेझ 
म्हणाला.

प्रगती आवश्यकच
एफसी गोवा संघास आणखी प्रगती आवश्यक आहे आणि काही बारीकसारीक बाबतीत लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे गोन्झालेझला वाटते. ‘‘निर्णायक क्षणी संघाची एकग्रता ढळत असल्याचे त्याला सलत आहे. पराभव हा खेळाचाच एक भाग आहे, आम्हाला खूपच व्यावसायिक बनावे लागेल,’’ असे तो म्हणाला.

शैली गमावलेली नाही

आमचा संघ चांगला खेळत असला, तरी नशिबाची साथ लाभत नसल्याची खंत एफसी गोवाच्या या बचावपटूने व्यक्त केली. ‘‘सुरवात चांगली नसली, तरी संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. आतापर्यंत आम्ही दोन चांगल्या संघांना सामोरे गेलो आहोत आणि दोन्ही लढतीत बहुतांश वेळ आम्ही वर्चस्व राखण्यात यश मिळविले. महत्त्वाची बाब म्हणजे, खेळलेल्या सामन्यात आम्ही शैली गमावलेली नाही. आमची तयारी चांगली आहे आणि कालच्या सामन्यात एक खेळाडू कमी असूनही संघाची प्रतिक्रिया सुखावणारी होती,’’ असे तीस वर्षीय बचावपटू म्हणाला.

अधिक वाचा :

सिलाच्या गोलमुळे नॉर्थईस्टने केरळा ब्लास्टर्सला २-२ च्या बरोबरीत रोखले 

 

संबंधित बातम्या