एफसी गोवाच्या शैलीमुळे इतर प्रस्ताव ठोकरले : जॉर्ज ऑर्टिझ

क्रीडा प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

इतर देशातील फुटबॉल क्लबकडून प्रस्ताव होते, पण एफसी गोवाची शैली भावली आणि त्यामुळेच इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील संघाशी करार केल्याची कबुली स्पॅनिश विंगर जॉर्ज ऑर्टिझ याने दिली आहे.

पणजी: इतर देशातील फुटबॉल क्लबकडून प्रस्ताव होते, पण एफसी गोवाची शैली भावली आणि त्यामुळेच इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील संघाशी करार केल्याची कबुली स्पॅनिश विंगर जॉर्ज ऑर्टिझ याने दिली आहे.

आयएसएल स्पर्धेच्या संकेतस्थळावरील वृत्तात ऑर्टिझ याने गोव्यातील संघाशी करार करण्यामागची भावना व्यक्त केली आहे. या २८ वर्षीय मध्यरक्षकाशी इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड विजेत्या संघाने २०२२ पर्यंत करार केला आहे. 

‘‘या वर्षी सुदैवाने माझ्यासाठी इतर देशांचेही पर्याय होते, पण एफसी गोवाचा प्रस्ताव आणि त्यांनी माझ्यात उत्सुकता दाखविल्यामुळे मी निर्णय घेतला. या संघातून माझे सहकारी आणि मित्र खेळले आहेत, त्यामुळे एफसी गोवाची निवड करण्यात मदत झाली. या क्लबबद्दल मी जे ऐकले, त्यांचे चाहते आणि शहर आदी अव्वल वाटले,’’ असे ऑर्टिझ म्हणाला. करार करण्यापूर्वी प्रशिक्षकाशी (ह्वआन फेरॅन्डो) याच्याशी चर्चा केल्याचेही त्याने स्पष्ट केले. एफसी गोवाचा स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असून आपण नियमितपणे त्याच्या संपर्कात असल्याची माहितीही स्पेनमधील सेगुंडा विभागीय स्पर्धेत खेळलेल्या या फुटबॉलपटूने दिली.

एफसी गोवाची खेळण्याची शैली आपल्यासाठी नैसर्गिक आहे, आपणास संधी उपलब्ध होताच आक्रमण करणे, ड्रिबलिंग आणि बचावपटूंकडे धाव घेणे आवडते, असे गेटाफे संघाच्या युवा उपक्रमाद्वारे जडणघडण झालेल्या ऑर्टिझने सांगितले.

चाहत्यांविना खेळणे पूर्णतः वेगळे
२०२०-२१ मोसमातील आयएसएल स्पर्धा पूर्णपणे गोव्यात होत आहे, पण एफसी गोवासाठी ही बाब फायदेशीर नसेल, असे त्याला वाटते. घरच्या मैदानावर चाहत्यांशिवाय खेळणे हे पूर्णतः वेगळे असेल. घरच्या मैदानावर खेळताना स्टेडियमचे स्टँड्स भरगच्च असताना भावनाच खास असते आणि संघाला मजबूत बनविते, असे मत त्याने व्यक्त केले. चाहत्यांविना सामना खेळण्याचा अनुभव ऑर्टिझला गतमोसमात स्पेनमध्ये मिळाला आहे. रेफरींनी सामना सुरू झाल्याची शिट्टी फुंकली, की खेळाडू सारे लक्ष मैदानावरच केंद्रित करेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. एफसी गोवाचे चाहते आणि त्यांची फुटबॉलप्रती उत्कटता याबाबत आपण भरपूर ऐकल्याचे त्याने नमूद केले. 

संबंधित बातम्या