पूर्ण क्षमतेने खेळण्याचा एफसी गोवाचा निर्धार

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील या वर्षातील शेवटचा सामना पूर्ण क्षमतेने खेळण्याचा निर्धार एफसी गोवाने केला आहे.

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील या वर्षातील शेवटचा सामना पूर्ण क्षमतेने खेळण्याचा निर्धार एफसी गोवाने केला आहे. त्यांची लढत लागोपाठ दोन सामने गमावलेल्या हैदराबाद एफसीविरुद्ध बुधवारी (ता. 30) वास्को येथील टिळक मैदानावर होईल.

एफसी गोवाने अगोदरच्या लढतीत जमशेदपूर एफसीला इगोर आंगुलोच्या इंज्युरी टाईम गोलमुळे हरविले, पण त्यापूर्वी त्यांना ओळीने दोन पराभव पत्करावे लागले होते. आता आठवडाभराच्या विश्रांतीनंतर एफसी गोवा संघ ताजातवाना होत बुधवारी मैदानात उतरेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी एफसी गोवाचे प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी सांगितले, की "आम्ही प्रत्येक सामन्यागणिक प्रगती साधत आहोत. आम्हाला शंभर टक्के क्षमतेने खेळावे लागेल. एक संघ या नात्याने मैदानावर काम करावे लागेल." आतापर्यंतच्या संघाच्या कामगिरीवर पूर्ण समाधानी नसून सातत्याची गरज त्यांनी प्रतिपादली.

एफसी गोवाचे सध्या आठ लढतीतून तीन विजय, दोन बरोबरी व तीन पराभव या कामगिरीसह 11 गुण आहेत. हैदराबादला नमविल्यास त्यांना पहिल्या चार संघात जागा मिळेल. मात्र फेरांडो प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्यास तयार नाहीत. ``हैदराबाद तुल्यबळ संघ आहे. त्या संघाला चेंडूवर ताबा राखणे आवडते. त्यामुळे आमच्यासाठी लढत वेगळी असेल, आम्ही नियोजन केले आहे,`` असे 39 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक म्हणाले. एफसी गोवाने आतापर्यंत 10 गोल नोंदविले आहेत, त्याचवेळी त्यांनी नऊ गोलही स्वीकारले आहेत. संघाच्या बचावाकडे आणखी लक्ष पुरविणे आवश्यक असल्याचे फेरांडो यांना वाटते.

स्पॅनिश मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद एफसीला अगोदरच्या लढतीत अनुक्रमे मुंबई सिटी व केरळा ब्लास्टर्सकडून हार पत्करावी लागली. त्यांचे सात लढतीनंतर दोन विजय, तीन बरोबरी व दोन पराभवासह नऊ गुण आहेत. केरळा ब्लास्टरविरुद्ध हैदराबादच्या बचावफळीतील मर्यादा उघड झाली होती. त्यांचे आक्रमणही मागील दोन लढतीत बोथट ठरले, त्यामुळे एफसी गोवास संधी मिळू शकते. पहिल्या दोन सामन्यांचा अपवाद वगळता मागील पाच लढतीत हैदराबादने गोल स्वीकारले आहेत.

 

दृष्टिक्षेपात...

  • - एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक 8 गोल
  • - हैदराबाद एफसीचे आरिदाने सांतानाचे 4 गोल
  • - आतापर्यंत हैदराबादच्या 2, तर एफसी गोवाची 1 क्लीन शीट
  • - मोसमात एफसी गोवाचे सर्वाधिक 4159 पासेस, त्याच कर्णधार एदू  बेदियाचे 602
  • - गतमोसमात 2 लढतीत एफसी गोवा विजयी
  • - हैदराबाद येथे 1-0, तर फातोर्डा येथे 4-1 फरकाने एफसी गोवाची बाजी

 

संबंधित बातम्या