AFC Champions League: एफसी गोवाची ऐतिहासिक कामगिरी; अल रय्यान क्लबला गोलशून्य रोखले

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

एफसी गोवाने आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदविताना पदार्पणात गुण मिळविण्याचा पराक्रम साधला.

पणजी: एफसी गोवाने आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदविताना पदार्पणात गुण मिळविण्याचा पराक्रम साधला. झुंजार खेळ करत हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने कतारमधील स्टार्स लीग आठ वेळा जिंकलेल्या अनुभवी अल रय्यान क्लबला गोलशून्य बरोबरीत रोखले.(FC Goa team wins with historic performance)

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Pandit Jawaharlal Nehru Stadium) झालेल्या लढतीत एफसी गोवाने तुल्यबळ खेळ केला. गोलशून्य बरोबरीमुळे त्यांना एक गुण मिळाला. भारतीय क्लबला एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत थेट प्रवेश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. फ्रान्सचे माजी दिग्गज फुटबॉलपटू लॉरें ब्लांक यांच्या मार्गदर्शनाखालील अल रय्यान संघाला गोव्याच्या संघाने विशेष मोकळीक दिली नाही. अल रय्यान क्लब एएफसी चँपियन्स लीग (AFC Champions League) स्पर्धेत दहाव्यांदा खेळत आहे. 

बंगळूर एफसीने धडाकेबाज खेळी करत, त्रिभुवन आर्मी संघाचा धुव्वा उडवला

सामन्यातील शेवटची तीन मिनिटे बाकी असताना एफसी गोवाचा (FC Goa) गोलरक्षक धीरज सिंग याची दक्षता निर्णायक ठरली. अल रय्यानचा आयव्होरियन स्ट्रायकर योहान बोली याचा धोकादायक हेडर धीरजने अचूक अंदाज बांधत फोल ठरविला, त्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. सामना संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना सेरिटन फर्नांडिसच्या दक्षतेमुळे योहान बोली याला चेंडूवरील नियंत्रण गमवावे लागले होते. त्यापूर्वी पूर्वार्धात धीरजने अल रय्यानच्या नैफ अल्हाधरामी याचा फटका रोखला होता, तर योहान बोली व यासिन ब्राहिमी याची नेमबाजी सदोष ठरली.

संबंधित बातम्या