एफसी गोवाविरुद्ध एक खेळाडू कमी होऊनही `टेन मेन` ईस्ट बंगालची गोलबरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 7 जानेवारी 2021

उत्तरार्धात एक खेळाडू कमी झाल्यानंतर दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या कोलकात्याच्या ईस्ट बंगालने स्पृहणीय खेळ करत एफसी गोवास 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

पणजी  :  उत्तरार्धात एक खेळाडू कमी झाल्यानंतर दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या कोलकात्याच्या ईस्ट बंगालने स्पृहणीय खेळ करत एफसी गोवास 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल अखेरच्या अकरा मिनिटांतील खेळ रंगतदार ठरला.

सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात तीन मिनिटांच्या फरकाने दोन गोल झाले. नायजेरियन आघाडीपटू ब्राईट एनोबाखारे याने 79व्या मिनिटास ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली, नंतर 81व्या मिनिटास बदली खेळाडू देवेंद्र मुरगावकर याच्या भेदक हेडिंगमुळे एफसी गोवाने बरोबरी साधली.

सामन्याच्या 56व्या मिनिटास ईस्ट बंगालचा एक खेळाडू कमी झाला. त्यांचा कर्णधार डॅनिएल फॉक्स याने अलेक्झांडर रोमारियो जेसूराज चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात असताना लाथ मारली, त्याबद्दल रेफरी ए. रोवन यांनी ब्रिटिश बचावपटूस थेट रेड कार्ड दाखविले.

ज्युआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाची ही 10 लढतीतील तिसरी बरोबरी ठरली. 15 गुणांसह त्यांनी तिसरा क्रमांक कायम राखला आहे. ईस्ट बंगालची ही चौथी बरोबरी ठरली. त्यांचे आता नऊ लढतीनंतर सात गुण झाले आहेत. त्यांनी एका गुणाची प्रगती साधताना नववा क्रमांक मिळविला आहे. रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने चार लढतीत अपराजित राहताना तीन बरोबरी व एक विजय नोंदविला आहे.

सलग दुसऱ्या सामन्यात गोल केलेल्या 22 वर्षीय ब्राईट एनोबाखारे याने जॅक मघोमा याच्या असिस्टवर एफसी गोवाच्या चौघा बचावपटूंना गुंगारा देत नंतर गोलरक्षक महंमद नवाझ यालाही चकविले. ब्राईटने अगोदर प्रिन्सटन रिबेलोस, नंतर ऐबान डोहलिंगला, इव्हान गोन्झालेझ आणि अखेरीस सेवियर गामा याला चकवा देत गोलरक्षकालाही संधी दिली नाही. मघोमा मैदानात बदली खेळाडूच्या रुपात आल्यानंतर एक खेळाडू कमी असलेल्या ईस्ट बंगालच्या आक्रमणास धार चढली. आघाडीनंतर कोलकात्याच्या संघाचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. सेवियर गामाच्या असिस्टवर उंच झेपावलेल्या 22 वर्षीय देवेंद्रच्या हेडरचा अंदाज ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजितला अजिबात आला नाही. सामन्याच्या ६७व्या मिनिटास प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी देवेंद्रला अलेक्झांडर रोमारियो जेसूराज याच्या जागी मैदानात पाठविले होते.

सामन्याच्या पूर्वार्धात एफसी गोवाने संधी निर्माण केल्या, पण ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार याच्या दक्षतेमुळे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. सामन्याच्या पाचव्याच मिनिटास ब्रँडन फर्नांडिसच्या फ्रीकिकवर जेम्स डोनाची याचा धोकादायक हेडर देबजितने उजव्या बाजूने झेपावत विफल ठरविला. विश्रांतीस नऊ मिनिटे बाकी असताना पुन्हा एकदा देबजित ईस्ट बंगालच्या मदतीस धावला. जोर्जे ऑर्तिझचा फटका त्याने अचूक अंदाज बांधत अडविला. तीन मिनिटानंतर सेवियर गामा याचा फटका अडविताना देबजित भक्कम ठरला.

 

दृष्टिक्षेपात...

- ब्राईट एनोबाखारे याचे 2 लढतीत 2 गोल

- देवेंद्र मुरगावकरचा 2 लढतीत 1 गोल

- एफसी गोवाचे 10 लढतीत 13 गोल, त्यांच्यावर  11 गोल

- ईस्ट बंगालचे 9 गोल, पण 15 गोल स्वीकारले

 

संबंधित बातम्या