एफसी गोवाचे पाठीराखे सर्वोत्तम : प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

कोविड-१९ महामारीमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा चाहत्यांविना रिकाम्या स्टेडियमवर खेळली जाणार हे खेदजनक आहे, मात्र सध्याची परिस्थिती सुधारून मोसमाच्या अंतिम टप्प्यात चाहत्यांच्या पाठिंब्यासह खेळण्याची आशा एफसी गोवा संघाचे स्पॅनिश प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो यांनी शुक्रवारी व्यक्त केली.  

पणजी :  कोविड-१९ महामारीमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा चाहत्यांविना रिकाम्या स्टेडियमवर खेळली जाणार हे खेदजनक आहे, मात्र सध्याची परिस्थिती सुधारून मोसमाच्या अंतिम टप्प्यात चाहत्यांच्या पाठिंब्यासह खेळण्याची आशा एफसी गोवा संघाचे स्पॅनिश प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो यांनी शुक्रवारी व्यक्त केली.  

‘‘घरच्या मैदानावर चाहत्यांचे प्रोत्साहन अत्यावश्यक असते. माझ्या माहितीनुसार, एफसी गोवाचे पाठीराखे भारतात सर्वोत्तम आहेत. त्यांच्याविना खेळणे खेदाचे आहे, पण त्याचवेळी सामने होत असल्याचा आनंद आहे,’’ असे फेरॅन्डो म्हणाले. २०२०-२१ मोसमात आयएसएल आणि एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत एफसी गोवा खेळणार असून फेरॅन्डो यांचे प्रशिक्षक या नात्याने भारतात पदार्पण आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे २०२०-२१ मोसमातील आयएसएल स्पर्धा येत्या २० नोव्हेंबरपासून गोव्यातील तीन स्टेडियमवर बंद दरवाज्याआड जैवसुरक्षा वातावरणात खेळली जाईल. आगामी मोसमापूर्वी एफसी गोवाच्या ३९ वर्षीय प्रशिक्षकाने आभासी पद्धतीने पत्रकारांशी संवाद साधला.

संघातील नवोदित आश्वासक
एफसी गोवा संघात सहा परदेशी खेळाडू आहेत, तुलनेच एक विदेशी खेळाडू कमी आहे, पण आपली तक्रार नाही. सध्याचा संघ चांगला आहे. उपलब्ध खेळाडूंसह मजबूत संघ निर्मिती हेच उद्दिष्ट्य आहे. स्पर्धेचे वेळापत्रक व्यस्त असले, तरी आव्हान स्वीकारावे लागेल. समाधानाची बाब म्हणजे, यंदा खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागणार नाही. वैद्यकीय स्टाफ खेळाडूंना तंदुरुस्त राखतील याचा विश्वास आहे. संघातील नवोदितही सज्ज होत आहेत, ते आश्वासक आहेत, असे फेरॅन्डो यांनी आपल्या संघाविषयी सांगितले.

संबंधित बातम्या