राष्ट्रीय स्पर्धा सज्जतेसाठी हवेत आणखी काही महिने

राष्ट्रीय स्पर्धा सज्जतेसाठी हवेत आणखी काही महिने
swimming pool

पणजी,

 कोरोना विषाणू महामारी देशात आटोक्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गोव्यात नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंकता आहे, मात्र गोवा सरकारने चार महिन्यांत स्पर्धेसाठी पूर्ण सज्ज होण्याचे लक्ष्य बाळगले आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक सर्व साधन सुविधा ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे आश्वासन राज्य सरकारवतीने देण्यात आले आहे. या आशयाचे पत्र गोवा क्रीडा प्राधिकरणाचे (एसएजी) कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई यांनी स्पर्धा तांत्रिक संचालन समितीचे (जीटीसीसी) अध्यक्ष मुकेश कुमार यांना पाठविले आहे. वारंवार लांबणीवर पडलेली ही स्पर्धा या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित असून देशातील सर्व राज्ये-संघराज्यांचे संघ स्पर्धेत भाग घेतील.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत गोवा ग्रीन झोनमध्ये आहे, पण गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण राज्याबाहेरून आलेले आहेत व त्यांच्याद्वारे सामाजिक संक्रमण झाले नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. देशातील कोविड-१९ रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. 

आयात उपकरणांची औपचारिकता पूर्ण

``सर्व काम ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आम्ही बाळगले आहे,`` असे वसंत प्रभुदेसाई यांनी ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. अंतर्गत मान्यता मिळाल्यानंतर निविदा मागविण्याची नोटीस जारी केली जाईल, असे एसएजीच्या कार्यकारी संचालकांनी स्पष्ट केले आहे. आयात कराव्या लागणाऱ्या महत्त्वपूर्ण क्रीडा उपकरणासाठी आवश्यक असलेली औपचारिकता पूर्ण झालेली आहे. बाकी उपकरणे देशांतर्गत खरेदी करायची आहेत, त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे आणि ठरलेल्या निश्चित कालावधीत व्यवस्था करता येईल,`` असे प्रभुदेसाई यांनी पत्रात म्हटले आहे.

परिस्थितीचे होणार आकलन

यापूर्वी क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे सचिव जे. अशोक कुमार यांनी गेल्या २७ एप्रिलला भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) सचिव राजीव मेहता यांना पत्र पाठविले होते. त्यात ३१ मेपर्यंत सर्व आवश्यक तयारीबाबत पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कळविण्यात आले होते. त्यानंतर ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत कोविड-१९ परिस्थितीचे आकलन आणि आयओएशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेण्याचे नमूद करण्यात आले होते. ‘‘आशा राखण्याव्यतिरिक्त या कठीण परिस्थितीत अधिक आश्वासन देऊ शकत नाही आणि भविष्यातील कृतीबाबत मी आपले मत ऐकण्यासाठी इच्छुक आहे,`` असे नमूद करत अशोक कुमार यांनी पत्राची सांगता केली होती. याचाच अर्थ गोवा सरकारने पुढील कार्यवाहीसंदर्भात आयओएकडून स्पष्टता अपेक्षिली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com