गोव्यातर्फे रणजी क्रिकेट खेळताना मोजक्याच पाहुण्यांचा फलंदाजीत ठसा

गोव्यातर्फे रणजी क्रिकेट खेळताना मोजक्याच पाहुण्यांचा फलंदाजीत ठसा
गोव्यातर्फे रणजी क्रिकेट खेळताना मोजक्याच पाहुण्यांचा फलंदाजीत ठसा

पणजी: हैदराबादचा मध्यफळीतील अनुभवी फलंदाज बावानाका संदीप आगामी देशांतर्गत क्रिकेट मोसमात गोव्यातर्फे खेळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही गोव्याकडून बरेच पाहुणे (व्यावसायिक) क्रिकेटपटू खेळले असून फलंदाजीत फक्त चौघांनीच एक हजाराहून जास्त धावा केलेल्या आहेत.

मुंबईचा मंदार फडके, हरियाना अजय रात्रा, कर्नाटकचा अमित वर्मा आणि तमिळनाडूचा व्ही. बी. चंद्रशेखर यांनीच गोव्याकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. हैदराबादच्या संघात नियमित स्थान मिळत नसल्याने २८ वर्षीय संदीपने दुसऱ्या संघाकडून खेळण्याचा पर्याय पसंत केला आहे. हैदराबाद क्रिकेट संघटनेने त्याला ना हरकत दाखला (एनओसी) दिला आहे. संदीपने २०१० मध्ये रणजी पदार्पणात शतक केल्यानंतर, ५८ प्रथम श्रेणी सामन्यांत सात शतकांसह ४४.८२च्या सरासरीने ३६३१ धावा केल्या.

पाहुणा खेळाडू या नात्याने गोव्यातर्फे खेळताना अमित वर्मा याने मागील दोन मोसमात धावांचे सातत्य राखले. त्याचा गोवा क्रिकेट असोसिएशनबरोबरचा व्यावसायिक करार अजून कायम आहे. तो गोलंदाजीतही चमकला, त्याने लेगस्पिनद्वारे गतमोसमात ४३, तर त्यापूर्वी १३ असे एकूण ५६ गडी बाद केले आहेत. फलंदाजीत डावखुऱ्या अमितने २०१८-१९ मोसमात ५४९, तर २०१९-२० मोसमात ८४८ धावा केल्या. त्याने दोन मोसमात १३९७ धावा केल्या आहेत.

गतवर्षी निधन झालेला माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चंद्रशेखर याने गोव्याकडून खेळताना तीन मोसमात (१९९५-९८) हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याने १३०९ धावा करताना अर्धशतकी सरासरी राखली. मुंबईचा डावखुरा मंदार फडके गोव्यातर्फे पाच मोसम (२००२-०७) खेळला. मंदारनेही पन्नासपेक्षा जास्त धावसरासरीने १४६८ धावा नोंदविल्या. माजी कसोटी यष्टिरक्षक अजय रात्रा याने रणजी क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे चार मोसम (२००७-११) प्रतिनिधित्व केले. या कालावधीत त्याने १३६३ धावांची नोंद केली. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com