नामुष्की टाळण्यासाठी हैदराबादचा संघर्ष

दैनिक गोमन्तक
रविवार, 3 जानेवारी 2021

हैदराबाद एफसी संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग तीन सामने पराजित असून आणखी नामुष्की टाळण्यासाठी संघर्ष करत आहे.

पणजी : हैदराबाद एफसी संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग तीन सामने पराजित असून आणखी नामुष्की टाळण्यासाठी संघर्ष करत आहे. मागील चार सामने अपराजित असलेल्या चेन्नईयीन एफसीचे सोमवारी (ता. 4) त्यांच्यासमोर कडवे आव्हान असेल.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादने एफसी गोवाविरुद्ध अखेरच्या तीन मिनिटांत दोन गोल स्वीकारले, त्यामुळे त्यांना स्पर्धेतील सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला. त्यापूर्वी मुंबई सिटी व केरळा ब्लास्टर्सनेही त्यांना हरविले होते. त्यांच्या खाती सध्या नऊ गुण आहेत. हैदराबादला त्रुटी असलेल्या बचावाने सतावले आहे. त्यांनी आतापर्यंत 10 गोल स्वीकारले आहेत. आक्रमणात आरिदाने सांताना याच्यावर जास्त ताण येत आहे. त्यांनी नोंदविलेल्या सातपैकी पाच गोल स्पॅनिश आघाडीपटूचे आहेत.

साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसी संघ मागील चार सामने अपराजित आहेत, त्यापैकी तीन सामने बरोबरीत राहिले आहेत. साहजिकच विजयाच्या पूर्ण गुणांसाठी सोमवारी चेन्नईचा संघ प्रयत्नशील असेल. एटीके मोहन बागानविरुद्ध सामन्यात वर्चस्व राखूनही त्यांना गोलशून्य बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले होते. एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याचा बचाव भेदणे चेन्नईयीनला शक्य झाले नव्हते. त्यांच्या आघाडीफळीस आणखी धारदार खेळ करावा लागेल. त्यांचे सध्या 10 गुण आहेत.

 

दृष्टिक्षेपात...

  • - चेन्नईयीन एफसीचे 8 सामन्यांत 2 विजय, 4 बरोबरी, 2 पराभव, 10 गुण
  • - हैदराबाद एफसी 8 पैकी 2 सामन्यांत विजयी, तर 3 लढतीत पराभूत, 3 बरोबरीसह 9 गुण
  • - हैदराबादच्या आरिदाने सांतानाचे 5 गोल
  • - चेन्नईयीनच्या 3, तर हैदराबादच्या 2 क्लीन शीट
  • - गतमोसमात चेन्नईयीनचे हैदराबादवर 2 विजय
  • - चेन्नई येथे 2-1, तर हैदराबाद येथे 3-1 फरकाने चेन्नईयीन विजयी
     

संबंधित बातम्या