ICC World Test Championship फायनलमध्ये न्यूझीलंड सोबत कोण करणार दोन हात?  

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2021 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी एक संघ निश्चित झालेला आहे. तर दुसरा संघ अजूनही समोर आलेला नसून, यासाठी तीन संघात चुरस सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2021 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी एक संघ निश्चित झालेला आहे. तर दुसरा संघ अजूनही समोर आलेला नसून, यासाठी तीन संघात चुरस सुरु आहे. न्यूझीलंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या फायनलमध्ये यापूर्वीच प्रवेश केला आहे. आणि भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही संघ या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अजूनही शर्यतीत आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंड संघावर विजय मिळवला आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. 

INDvsING: जड़ें तो पहले ही उखाड़ दी थीं... म्हणत अमिताब बच्चन यांनी केले भारतीय...

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली आहे. यापूर्वीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने 227 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 317 धावांनी पाहुण्या संघाचा पराभव केला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रेसमध्ये टीम इंडियाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर संघाचे पर्सेन्टाइल 69.7 झाले आहे. आणि त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाचा पर्सेन्टाईल 69.2 असल्याने कांगारूंचा संघ तिसऱ्या नंबरवर आणि इंग्लंडच्या संघाचा पर्सेन्टाईल 67.0 झाल्याने हा संघ चौथ्या स्थानावर आला आहे. परंतु त्यानंतर देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीच्या संघाची निश्चिती झालेली नाही.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाल्यानंतर देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये कोणता संघ उतरणार हे निश्चित होऊ शकलेले नाही. याशिवाय भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठीचा संघ निश्चिती होण्यासाठी 15 शक्यता होत्या. मात्र त्यानंतर आता 5 शक्यता बाकी आहेत ज्यावरून तीन संघांपैकी एक संघ न्यूझीलंडसोबत फायनल खेळणार आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड -

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जाण्याच्या शर्यतीत आहे. आणि भारत व इंग्लंड यांच्यातील मालिकेत तीन शक्यता आहेत, ज्यावरून कांगारूंचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचू शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका 2 - 2 ने किंवा 1 - 1 ने अनिर्णित राहिल्यास आणि जर इंग्लंडने ही मालिका 2 - 1 ने जिंकल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये खेळू शकतो.        

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड - 
त्यानंतर, भारत आणि इंग्लंड यांच्यातील चालू मालिकेतील आगामी दोन्ही सामने इंग्लंडच्या संघाने जिंकल्यास इंग्लंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचणार आहे. आणि इंग्लंडच्या संघाला यासाठी आगामी दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड - 
याशिवाय, भारतीय संघाकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याच्या दोन संधी आहेत. टीम इंडियाने इंग्लंड सोबतच्या चालू असलेल्या मालिकेत अजून एक सामना जिंकून, पुढचा सामना अनिर्णित राखल्यास भारतीय संघ फायनल मध्ये पोहचणार आहे. तर आगामी दोन्ही सामने भारताने जिंकल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये न्यूझीलंड सोबत खेळताना दिसणार आहे.  

संबंधित बातम्या