IndvsEng 1Test Day 3rd: इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत; तर भारतीय संघावर फॉलो ऑनची टांगती तलवार   

दैनिक गोमन्तक
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून, भारतीय संघाने 74 ओव्हर्स मध्ये सहा गडी गमावून 257 धावा केलेल्या आहेत. मात्र यामुळे भारतीय संघावर फॉलो ऑनचे वादळ घोंघावत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून, भारतीय संघाने 74 ओव्हर्स मध्ये सहा गडी गमावून 257 धावा केलेल्या आहेत. मात्र यामुळे भारतीय संघावर फॉलो ऑनचे वादळ घोंघावत आहे. पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ इंग्लंडच्या संघाने आठ विकेट गमावत 555 धावांवर सुरु केला. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर आटोपला. व  भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने सहा गड्यांच्या मोबदल्यात 257 जमवल्या आहेत. आणि भारतीय संघ पहिल्या डावात अजूनही 321 धावांनी मागे आहे. 

ISL 2020-21: ईस्ट बंगालचा जमशेदपूरला पराभवाचा धक्का

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार जो रूटच्या दमदार द्विशतकीय आणि डॉम सिब्ले आणि बेन स्टोक्सच्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडच्या संघाने दमदार सुरवात केल्याचे पाहायला मिळाले. त्याबदल्यात भारतीय संघाला फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर रोहित शर्माच्या रूपात पहिला झटका बसला. रोहित शर्माला अवघ्या सहा धावांवर जोफ्रा आर्चरने जोस बटलर करवी झेलबाद केले. त्यानंतर शुभमन गिलला देखील जोफ्रा आर्चरने माघारी धाडले. शुभमन गिल 29 धावांवर झेलबाद झाला. तर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावेळी पितृत्वाच्या रजेवर गेलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पुनरागमनानंतर स्वस्तात माघारी परतल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीला डॉम बेसने फक्त 11 धावांवर बाद केले. विराटचा ओली पोपने झेल घेतला. 

रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली परतल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. अजिंक्य रहाणेला फक्त एक रनवर डॉम बेसने जो रूट कडे झेलबाद केले. त्यामुळे भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले. परंतु एका बाजूला चेतेश्वर पुजाराने भारताची पडझड काहीशी रोखल्याचे चित्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दिसले. चेतेश्वर पुजाराला रिषभ पंतने यावेळी चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकीय भागीदारी रचली. पण यानंतर चेतेश्वर पुजारा डॉम बेसचा बळी ठरला. डॉम बेसने चेतेश्वर पुजाराला 73 धावांवर बाद केले.  चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात 143 चेंडूंचा सामना करत, 11 चौकारांच्या मदतीने 73 धावा केल्या. तर रिषभ पंतने धमाकेदार खेळी करत फक्त 40 चेंडूत अर्धशतक झळकावले. रिषभ पंतने चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने अर्धशतक केले.    

चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर टीम इंडियाची धुरा रिषभ पंत पुढे नेत असतानाच तो पुन्हा एकदा नर्वस नाईंटीचा शिकार झाला. रिषभ पंत 91 धावांवर असताना, डॉम बेसने जॅक लीचकरवी त्याला झेलबाद केले. त्यामुळे भारतीय संघाला सहावा धक्का बसला. रिषभ पंतने पहिल्या डावात 88 चेंडूंचा सामना करत, 9 चौकार आणि 5 षटकारांच्या बळावर  91 धावा केल्या. तर तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत वॉशिंग्टन सुंदर 33 आणि रविचंद्रन अश्विन 8 धावांवर खेळत आहेत. 

दरम्यान, तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात इंग्लंडच्या संघातील डॉम बेसने सर्वाधिक चार विकेट्स घेतलेल्या आहेत. तर जोफ्रा आर्चरने दोन बळी टिपले आहेत.  आणि यापूर्वी भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी तीन-तीन बळी मिळवलेले आहेत. याशिवाय इशांत शर्मा आणि शाहबाझ नदीम यांनी दोन-दोन विकेट्स घेतलेल्या आहेत.                                    

 

संबंधित बातम्या